संत सेवालाल महाराज | About Sant Sevalal maharaj in Marathi

संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील गुत्ती तालुक्यात गोलार दोडी तांडा येथे झाला. हा दिवस बंजारा समाजात विशेष महत्वाचा मानला जातो. त्यांचे वडील भीमा नाईक हे एक मोठे पशुपालक आणि 52 तांड्यांचे नायक होते. त्यांची गणना त्या भागातील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये होती. आई धर्मानी या धार्मिक आणि सुशील गृहिणी होत्या. भीमा नाईक आणि धर्मानी यांना चार मुले होती, ज्यात सेवालाल महाराज सर्वात मोठे होते. लहानपणापासूनच सेवालाल महाराजांचा स्वभाव विरक्त होता, त्यांना सांसारिक मोहमाया आणि ऐशोआरामात रस नव्हता.
कौटुंबिक पार्श्वभूमी
सेवालाल महाराजांचे कुटुंब समृद्ध आणि प्रतिष्ठित होते. त्यांचे आजोबा रामशहा नायक हे 52 तांड्यांचे प्रमुख होते, तर वडील भीमा नाईक 41 तांड्यांचे नायक होते. भीमा नाईक यांना अनेक भाषांचे ज्ञान होते आणि त्यांचा इंग्रजांशी व्यापारिक करार होता, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खूप मजबूत होती. जवळपास 4000 ते 5000 गायी-बैल त्यांच्या संपत्तीत होते, जे धान्य वाहतुकीसाठी वापरले जात होते. बंजारा समाजात तांड्याचे महत्त्व खूप मोठे असते आणि नायकाची भूमिका निर्णायक असते. अशा प्रतिष्ठित कुटुंबात जन्म घेऊनही सेवालाल महाराजांनी साधे जीवन जगणे आणि समाजसेवेचा मार्ग निवडला.
वैवाहिक जीवन
संत सेवालाल महाराजांच्या वैवाहिक जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु, काही कथांनुसार, त्यांच्या आई जगदंबा यांनी त्यांना विवाह करण्याचा आग्रह केला होता, परंतु सेवालाल महाराजांनी समाजाच्या कल्याणासाठी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सुधारणा आणि मानव कल्याणासाठी समर्पित केले.
शिकवण आणि विचार
संत सेवालाल महाराजांचे विचार मानवतावादी होते. त्यांनी समाजाला सत्य, अहिंसा, प्रेम, आणि करुणेचा मार्ग दाखवला. त्यांच्या प्रमुख शिकवणी खालीलप्रमाणे आहेत.
मानवता धर्म
सेवालाल महाराजांनी माणूसकीला सर्वोच्च धर्म मानले. त्यांनी जात, धर्म, लिंग भेद न करता सर्वांना समान मानण्याचा उपदेश केला. “देव मंदिरात नाही, माणसात आहे” हे त्यांचे वचन आजही प्रसिद्ध आहे.
पर्यावरण संरक्षण
सेवालाल महाराजांनी जंगल आणि पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते. “जंगल वाचवा, तर तुम्ही स्वतःला वाचवाल” असा संदेश त्यांनी दिला. आजच्या काळात पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विचार अधिक Relevant ठरतात.
स्त्री सन्मान
सेवालाल महाराजांनी स्त्रियांचा आदर करण्याचा आणि मुलींना देवी मानण्याचा उपदेश केला. त्यांनी समाजात स्त्रियांच्या समानतेचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार केला.
अहिंसा आणि शाकाहार
सेवालाल महाराज अहिंसेचे पुजारी होते. त्यांनी प्राणी हत्या आणि बळी प्रथेला कडाडून विरोध केला. “कसाईला गाय विकू नका, पशू प्राण्यांवर प्रेम करा” हे त्यांचे वचन प्राणिदया आणि अहिंसेचे महत्त्व स्पष्ट करते. ते स्वतः शाकाहारी होते आणि त्यांनी समाजाला शाकाहाराचे महत्त्व पटवून दिले.
सत्य आणि प्रामाणिकपणा
“खोटे बोलू नका, चोरी करू नका” असा उपदेश त्यांनी दिला. सत्य आणि प्रामाणिकपणाने जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी समाजात रुजवला.
अंधश्रद्धा निर्मूलन
“जाणून घ्या, विचार करा, मगच स्वीकारा” हा त्यांचा उपदेश अंधश्रद्धा आणि रूढीवादी विचार दूर करण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांनी समाजाला तर्कशुद्ध आणि विवेकी विचारसरणीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले.
गरजूंची मदत
“गरजू लोकांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या” या शिकवणीतून त्यांनी समाजाला परोपकार आणि दातृत्वाचे महत्त्व सांगितले. “एका रुपयाला वाटीभर पाणी विकू नका” या वचनातून त्यांनी निस्वार्थ सेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला.
समाज सुधारणेतील कार्य
अठराव्या शतकात बंजारा समाज अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्यांनी वेढलेला होता. अन्नासाठी भटकंती, निरक्षरता, अंधश्रद्धा, आणि गुन्हेगारी यांसारख्या समस्यांनी समाज त्रस्त होता. अशा परिस्थितीत संत सेवालाल महाराजांनी समाजाला नवी दिशा दिली.
- अन्नासाठी होणारी भटकंती थांबवण्याचा प्रयत्न:- बंजारा समाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत असल्याने त्यांची प्रगती खुंटली होती. सेवालाल महाराजांनी समाजाला एका ठिकाणी स्थिर होऊन विकास साधण्याचा सल्ला दिला.
- गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न:- अठराव्या शतकात उपासमारीमुळे बंजारा समाज चोरी आणि गुन्हेगारीकडे वळला होता. सेवालाल महाराजांनी लोकांना चोरी न करण्याचा सल्ला दिला आणि मेहनत करून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. “आपण मेहनत करणारे आहोत, गुन्हेगार नाही” हे त्यांनी समाजाला समजावून सांगितले.
- शिक्षण आणि जनजागृती:- त्याकाळात बंजारा समाजात शिक्षणाचा अभाव होता. सेवालाल महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या उपदेशातून समाजाला ज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.
- रूढी आणि परंपरांविरुद्ध लढा:- बंजारा समाजात अनेक अनिष्ट रूढी आणि परंपरा प्रचलित होत्या, ज्यात बळी प्रथा प्रमुख होती. सेवालाल महाराजांनी या प्रथांविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. त्यांनी भजन, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून समाजाला अंधश्रद्धा आणि रूढींपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
- सामाजिक एकता:- त्याकाळात बंजारा समाज अनेक गटांमध्ये विभागलेला होता. सेवालाल महाराजांनी समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. दिल्ली येथे त्यांनी मोठी पंचायत भरवून समाजाला एकजूट करण्याचा प्रयत्न केला.
वारसा आणि प्रभाव
संत सेवालाल महाराज हे केवळ बंजारा समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण मानव जातीचे मार्गदर्शक ठरले. त्यांच्या मानवतावादी विचारांचा आणि समाजसुधारणेच्या कार्याचा प्रभाव आजही बंजारा समाजात आणि इतर समुदायांमध्ये दिसून येतो.
कुलदैवत:– बंजारा समाज संत सेवालाल महाराजांना आपले कुलदैवत मानतो. प्रत्येक बंजारा तांड्यात त्यांची मंदिरे आणि प्रार्थनास्थळे आहेत.
जयंती उत्सव:- महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांमध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केली जाते. या उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात आणि त्यांच्या शिकवणीचे स्मरण करतात.
मंदिरे आणि समाधी:- पोहरागड (वाशिम जिल्हा, महाराष्ट्र) येथे त्यांची समाधी आहे, जे बंजारा समाजाचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. याशिवाय, अनेक ठिकाणी सेवालाल महाराजांची मंदिरे बांधली गेली आहेत, जी भक्तांना प्रेरणा देतात.
लोकगीते आणि भजने:- बंजारा उत्सवांमध्ये सेवालाल महाराजांची स्तुती करणारी लोकगीते आणि भजने गायली जातात, जी त्यांच्या विचारांना आणि कार्याला लोकांपर्यंत पोहोचवतात.
शिकवणीचा प्रसार:- संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीचा प्रसार आजही विविध माध्यमांतून केला जातो. त्यांच्या वचनांचे आणि उपदेशांचे पालन करून बंजारा समाज प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.