सत्तेविषयी दृष्टीकोन | Perspectives on Power
सत्ता ही अधिमान्यता प्राप्त शक्ती आहे. सत्ताधारकाद्वारे ज्या लोकांवर सत्तेचा वापर केला जातो त्यास ते अधिमान्यतापूर्ण, न्यायपूर्ण व योग्य मानतात. सत्ताधारकांची सत्ता स्वीकारण्यासंदर्भात त्यांच्यात तीन प्रकारचे सत्तेविषयी दृष्टीकोन दृष्टीकोन असतात.
नकारात्मक दृष्टीकोन
जेव्हा लोक सत्ताधारकांची शक्ती एक बंधन समजून किंवा शिक्षाच्या व दंडाच्या भितीमुळे मान्य करतात तेव्हा सत्तेविषयी लोकांचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा असतो. सत्ताधाऱ्यांचे निर्णय, आदेश, धोरणे स्वईच्छेने स्वीकारण्याची कधी कधी लोकांची मानसिकता नसते. परंतु सत्ताधारकांच्या दबावापोटी किंवा आदेश न पाळल्यास शिक्षा व दंड केला जाईल. तसेच पोलीसाद्वारे, सैन्याद्वारे व न्यायालयाद्वारे कारवाई केली जाईल ह्या भितीपोटी लोक सत्ताधारकाचा आदेश व निर्णय पाळतात तेव्हा लोकांचा सत्तेविषयीचा नकारात्मक दृष्टीकोन असतो.
सत्ताधारकाला विश्वासपूर्ण भावनेने, खूप मोठ्या अपेक्षेने सत्ता प्रदान करण्यात आलेली असते. परंतु सत्ताधारकांचे निर्णय, भूमिका, धोरणे, कायदे, सत्तापालनकर्त्यांच्या अपेक्षेच्या व विश्वासाच्या अनुकूल नसल्यास त्याचे पालन करण्यासाठी जनता ईच्छूक नसते अशावेळी नाईलाजास्तव, बंधनकारक म्हणून, कायद्याच्या, शिक्षेच्या न्यायालयीन व पोलीसी कारवाईच्या भितीपोटी केवळ त्यांचे पालन केले जाते तेव्हा जनतेच्या शासनाविषयीचा हा दृष्टीकोन नकारात्मक असतो.
सकारात्मक दृष्टीकोन
जेव्हा सत्तापालन कर्ते लोक सत्ताधारकांचा आदेश आपल्या हिताचा व कल्याणाचा आहे म्हणून स्वइच्छेने, स्वखुशीने स्वीकार करतात तेव्हा लोकांचा सत्तेविषयीचा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा असतो. लोकांनी सकारात्मक इच्छेने, भावनेने, अपेक्षेने व विश्वासाने सत्ताधारकाला सत्ता प्रदान केलेली असते. सत्ताधारकाने जनतेच्या इच्छेच्या, भावनेच्या, विश्वासाच्या व अपेक्षेच्या अनुरूप कार्य करावे, निर्णय घ्यावे, धोरणे राबवावी व कायदे करावेत. अशी सत्ता प्रदानकर्त्यांची इच्छा असते. जनकल्याणाच्या, जनहिताच्या दृष्टीकोनातून सकारात्मक कार्य करावे, निर्णय व धोरणे निर्धारीत करून त्यांची प्रभावीपणे अंमलबाजवणी करावी असे लोकांना वाटते त्यानुसार सत्ताधारकाने कृती व कार्य केल्यास लोक समाधानी होवून सत्तेविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवतात.
तर्कयुक्त दृष्टीकोन
जेव्हा लोक सत्ताधारकाच्या शक्तीला पूर्णत समजून घेवून स्वीकारतात, जेव्हा ते शक्तीच्या दुरूपयोगाला आव्हान देण्यासाठी तयार असतात, तसेच सत्ताधारकाच्या उत्तरदायीत्वाविषयी पूर्णपणे जागरूक असतात तेव्हा त्याला सत्तेविषयीचा तर्कयुक्त दृष्टीकोन म्हटले जाते. खऱ्या अर्थाने सत्तेविषयी लोकांचा दृष्टीकोन तर्कयुक्त असणे आवश्यक असते. विकसित राजकीय व्यवस्थेत सत्तेविषयी असा दृष्टीकोन त्या व्यवस्थेतील लोकांमध्ये असल्याचे दिसून येते.