
३१ ऑगस्ट भटके विमुक्त दिन : इतिहास, महत्व आणि साजरीकरण | 31 Aug Bhatke Vimukt Din
भटक्या व विमुक्त समाजाचा इतिहास हा केवळ दुःखद नाही तर संघर्ष व स्वाभिमानाची कहाणी आहे. सन 1871 साली ब्रिटीश सरकारने Criminal Tribes Act अंतर्गत काही जातींना ‘गुन्हेगार जाती’ म्हणून घोषित केले. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना अमानवीय अत्याचारांना सामोरे जावे लागले. स्वातंत्र्य मिळूनही या समाजाला न्यायासाठी आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला.
मात्र, ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने हा कायदा रद्द करून या जातींना ‘विमुक्त’ म्हणून मान्यता दिली. तेव्हा पासून ३१ ऑगस्ट भटके विमुक्त दिन साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाला एक ऐतिहासिक व भावनिक महत्त्व आहे.

शासन निर्णय : ३१ ऑगस्ट ‘भटके विमुक्त दिन’ म्हणून
महाराष्ट्र शासनाने दिनांक ३१ जुलै २०२५ रोजीचा निर्णय (क्रमांक : सांदकण-2025/प्र.क्र.98/मावक) घेतला आहे, ज्यामध्ये दरवर्षी ३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिन’ म्हणून राज्यभर साजरा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
शासन निर्णयाची संपूर्ण प्रत येथे वाचा- शासन निर्णय – भटके विमुक्त दिन (३१ ऑगस्ट)
विमुक्त दिनाचे महत्व
- भटक्या व विमुक्त समाजाच्या ऐतिहासिक अन्यायाची आठवण करून देणारा दिवस.
- त्यांच्या स्वातंत्र्यातील व राष्ट्रनिर्मितीतील योगदानाची कदर करण्याची संधी.
- समाजात स्वाभिमान, एकजूट व जागरूकता निर्माण करण्याचा प्रसंग.
- पुढील पिढ्यांना इतिहासाची खरी जाणीव करून देण्याचा मार्ग.
संस्था, संघटना व समाजाने काय करावे?
- सांस्कृतिक कार्यक्रम – भटक्या समाजाच्या परंपरा, लोककला, नृत्य व संगीत सादर करणे.
- शैक्षणिक उपक्रम – मुलांसाठी कार्यशाळा, वाचन स्पर्धा, चर्चासत्र.
- आरोग्य शिबिरे – विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे.
- दस्तऐवज नोंदणी – आधारकार्ड, जात नोंदणी, जात वैधता प्रमाणपत्र यांसाठी मदत शिबिरे.
- प्रेरणादायी व्याख्याने – भटक्या समाजाच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे अनुभव मांडणे.
- सामूहिक एकजूट कार्यक्रम – जिल्हास्तरीय वा गावपातळीवर मेळावे, रॅली, सभा आयोजित करणे.
३१ ऑगस्ट हा दिवस केवळ उत्सव नसून आत्मसन्मान आणि हक्कांच्या लढ्याची जाणीव करून देणारा दिवस आहे. संस्था, संघटना आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने हा दिवस सजगतेने, ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन व स्वाभिमानाने साजरा करावा.