Peace Of Mind In Marathi | मन शांत कसे करावे
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येक व्यक्तीला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. यामुळे आपले मन अशांत होते. मनाला शांत ( Peace Of Mind ) कसे करावे हा प्रश्न अनेकांना सतावतो. तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, मनाला नेहमीच कशाची तरी हुरहूर लागून असते, चिंता सतावत असते. मन एका विशिष्ट गोष्टीकडे धाव घेण्याची प्रवृत्ती ठेवते. अनेक गोष्टी एकाच वेळी मनात घोळत असल्याने किंवा कशाला प्राधान्य द्यावे हे ठरवलेले नसल्याने मन अस्वस्थ होते.

झोपेतून उठल्यावर मन शांत राहते | Peace Of Mind
तुम्ही मन शांत असल्याचा अनुभव दिवसातून कधी घेतला आहे का? जेव्हा आपण शांत झोपेतून उठतो, तेव्हा आपले मन शांत आणि ताजेतवाने असते. दिवसाही कधीतरी थोडा वेळ झोपून उठल्यास असेच वाटते. याचे कारण म्हणजे झोपेमुळे शरीर आणि मन ‘रिचार्ज’ होते, त्यांना नवी ऊर्जा मिळते. जसजशी ही ऊर्जा (एनर्जी) दिवसभरात कमी होत जाते, तसतसे मन पुन्हा अशांत होऊ लागते.
मनाच्या शांततेसाठी पुरेशी झोप आवश्यक असते.
त्यासाठी जीवनाला एक शिस्त लावणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या कामाची एक दैनंदिन दिनचर्या ठरलेली असावी. उदा. विशिष्ट वेळेला उठणे, आपली नित्यकर्मे करणे, व्यायाम करणे, वेळेवर न्याहारी घेणे, कामाला जाणे, संध्याकाळी घरी आल्यावर कुटुंबासोबत वेळ घालवणे, मनोरंजनासाठी काही वेळ देणे आणि रात्री सात ते आठ तास पुरेशी झोप घेणे.
काम करीत असताना स्वःतला शिस्त आवश्यक आहे | Peace Of mind
कामाच्या वेळी केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही कामाला पूर्ण करण्यासाठी विशिष्ट वेळेची आवश्यकता असते आणि प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची क्षमता व गती वेगळी असते. त्यामुळे तुमच्या स्वभावाप्रमाणे आणि क्षमतेनुसार एखाद्या कामासाठी किती वेळ लागतो याचा अंदाज घेऊन त्यानुसार तुमच्या कामाचे नियोजन करा. कोणतेही काम वेळेआधी पूर्ण करण्याचा अट्टाहास करणे किंवा उगाच वेळकाढूपणा करणे टाळा. शरीराकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. जशी आपण शरीराकडून कामाची अपेक्षा करतो, तसेच ते आपल्या विश्रांतीची आणि ऊर्जेचीही अपेक्षा करते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. प्रमाणबद्ध गोष्टी करण्यावर भर द्यावा. जेव्हा जीवनाचा दिनक्रम बिघडतो, तेव्हा हळूहळू मनावरही त्याचा परिणाम होतो आणि मन अशांत होऊ लागते.
मन शांत कसे कराल | Peace Of mind
‘ज्याने मन जिंकले, त्याने जग जिंकले’ असे आपण ऐकले आहेच. मन अशांत असते, चंचल असते. बाह्य परिस्थितीनुसार मनात अनेक विचार येत राहतात. मानसिक स्तरावर मनुष्य वेगळ्या पद्धतीने विचार करतो, तर भौतिक स्तरावर, म्हणजे इतरांना दिसेल अशा प्रकारे वागतो. माणसाचे खरे स्वरूप त्याच्या अंतरंगात, मनात सुरू असलेल्या विचारांवर अवलंबून असते. मन कधी कोणते विचार करेल याचा नेम नाही. कधी ते एखाद्या गोष्टीवर एकाग्र होईल याचाही भरोसा नाही. जेव्हा आपण एखाद्या कामात पूर्णपणे रमून जातो, स्वतःला विसरतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने एकाग्रता साधते. जीवनात असे अनेक क्षण आले असतील, जेव्हा तुमचे मन पूर्णपणे एकाग्र झाले असेल किंवा तुम्ही ‘मन’ हा शरीराचा भाग आहे हे विसरून कामात तल्लीन झाला असाल. मात्र, कधीकधी मन विचित्र विचारशृंखला तयार करून त्यात स्वतःला गुंतवून ठेवते. अशा या चंचल मनाला शांत करण्यासाठी काही विधी, साधना किंवा कृती करणे आवश्यक आहे.
अवास्तव कल्पना करणे बंद करावे.
पहिले म्हणजे, मनात अवास्तविक विचार किंवा केवळ कल्पना तयार झाल्यास, त्यातून लगेच बाहेर पडण्याचा सराव करा. स्वतःला सांगा, “मी हे काय विचार करत आहे? चला, वास्तवाचा विचार करूया.” कल्पनाविश्वात रमल्यास त्याला अंत राहात नाही आणि मन अधिक खोल गुंतत जाते. त्यामुळे केवळ कल्पना न करता, सभोवताली असलेल्या वास्तविक गोष्टींचे आणि सद्यस्थितीचे निरीक्षण करा.
श्वासावर लक्ष केंद्रित करा.
काही काळ दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत घेताना आणि बाहेर सोडतानाच्या प्रत्येक क्षणाकडे लक्ष द्या. श्वास घेतल्यावर शरीरात होणाऱ्या सूक्ष्म हालचालींचा अनुभव घ्या. शरीरामध्ये जाणवणाऱ्या विविध संवेदनांचे निरीक्षण करा. हजारो संवेदना येतात आणि जातात. त्यांचे केवळ साक्षीदार बना. यामुळे मन शरीरावर केंद्रित होईल – कुठे खाजवतेय, कुठे धडधडतेय (भडभडतेय), कुठे जड वाटतंय अशा संवेदनांवर मन लक्ष देईल. हे सर्व करण्यापूर्वी, सुरुवातीला मनाला केवळ श्वास घेणे-सोडणे, तो कुठून येतोय-कुठून जातोय यावर केंद्रित करा आणि नंतर हळूहळू शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाणवणाऱ्या सुखद किंवा दुखद संवेदनांवर लक्ष न्या.
शरीराच्या आत आणि बाहेर जाणवणाऱ्या संवेदनाचा अनुभव करा.
ध्यानधारणा (Meditation) हा मन शांत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. याच्या अनेक पद्धती आहेत. तुम्हाला सोयीस्कर वाटेल ती पद्धत वापरून तुम्ही मन शांत करू शकता. जेव्हा मन अशांत वाटेल, त्यावेळेला त्या ठिकाणाहून काही वेळासाठी दूर जाऊन काही मिनिटे शांतपणे घालवा. शांतपणे पाणी प्या. पाणी शरीरात गेल्यानंतर होणाऱ्या सूक्ष्म संवेदनांवर लक्ष द्या. आपल्या शरीराच्या अंतरंगातील अनेक अवयव आणि ते करत असलेल्या कामाबद्दलच्या संवेदना अनुभवा. शरीराअंतर्गत असणारे हे अवयव आपल्याला दिसत नसले तरी, शरीराची यंत्रणा व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी ते दिवसरात्र कार्यरत असतात. याबद्दल निसर्गाचे, निर्मात्याचे आपण नेहमीच आभार मानायला पाहिजे. निसर्गाने आपल्याला काय दिले नाही यापेक्षा काय काय दिले याबद्दल आपण कृतज्ञ असावे. सातत्याने त्या निर्मात्याचे आभार माना, त्यांच्यामुळेच आपण आज या भूतलावर आहोत. तसेच, समाजाने तयार केलेल्या व्यवस्थेचे लाभ आपण घेत आहोत, त्याबद्दलही आपण सातत्याने आभार व्यक्त करायला पाहिजे.
आणि कोणत्याही परिस्थितीत शांत राहून मनाची शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत राहा. भगवान बुद्धांचे स्मरण करा. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करा. यामुळे नक्कीच मन शांत होण्यास मदत होईल.
सुदृढ मनासाठी व्यायाम महत्वाचे | Peace Of Mind
‘सुदृढ शरीरात सुदृढ मन वसते.’ नियमित व्यायाम करा. रोज सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळाल्यास प्रदूषण नसलेल्या ठिकाणी दूरपर्यंत फिरायला जा. परत आल्यावर जी शांती अनुभवता येते, ती खरोखरच अवर्णनीय आहे. निसर्गाने आपल्याला जे काही दिले आहे, ते अद्भुत आणि मौल्यवान आहे.
छंद जोपासा
तुमचे मन रमणाऱ्या विषयातील पुस्तकांचे वाचन करा. तुम्हाला आवडणाऱ्या टीव्ही मालिका किंवा चित्रपट पहा. तुम्हाला आवडणाऱ्या ठिकाणी भेट द्या. यामुळे मनाला समाधान मिळेल आणि मन शांत होईल. मुळातच मन अशांत असते. त्याला नेहमी हेच समजावून सांगा की मन ज्याचा शोध घेत आहे, ती गोष्ट कदाचित जगात अस्तित्वात नाही किंवा जरी ती मिळाली तरीही मन अशांतच राहू शकते. म्हणून, मनाचा स्वभावच अशांत आहे हे लक्षात घेऊन, ज्याही परिस्थितीत मन अस्वस्थ वाटेल, तिथून काही काळ दुसरीकडे जाऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा.