जैविक घड्याळ | The Biological Clock of Human body
शरीरातील जैविक घड्याळ- रात्री गाढ झोप येण्यासाठी मेलाटोनिन हे संप्रेरक कारणीभूत असते. मेलाटोनिन हे बहुत करून रात्रीच्या वेळेमध्ये बनते आणि दिवसा ते बनत नाही.
जाणून घ्या चांगल्या झोपे करिता मानवी शरीरातील जैविक घड्याळ, पुरेशी झोप घेण्याचे फायदे, झोप न घेतल्यामुळे शरीरावर व मनावर होणारा नकारात्मक परिणाम इत्यादी बाबत माहिती घेणार आहोत.
मित्रांनो, जर आपण साधारणपणे आजूबाजूला पाहिले तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नैसर्गिक लयबध्दतेनुसार होताना आढळून येतील जसे कि समुद्र किनाऱ्यावर ठराविक सेकंदानी येणाऱ्या लाटा, दररोज साडेबारा तासानंतर समुद्राला येणारी भरती आणि ओहोटी, दरदिवशी होणारा उजेड (दिवस) आणि अंधार(रात्र), व एकापाठोपाठ येणारे ऋतू उन्हाळ्यानंतर पावसाळा व त्यानंतर येणारा हिवाळा वरील सर्व नैसर्गिक भौतिक लयबद्धतेनुसार होणाऱ्या गोष्टी आहेत. लयबद्धता म्हणजे लागोपाठ होणाऱ्या घटनांची पुन:पुन्हा विशिष्ट वेळेत ठरलेल्या क्रमात आणि ठरलेल्या वेळेनंतर होत राहणे म्हणजे लयबध्दता होय.
आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यास परिवलन असे म्हणतात व पृथ्वी जेंव्हा स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्यास परिभ्रमण असे म्हणतात. परिवलन व परिभ्रमण ह्या अंदाजे तीन ते चार अब्जावधी वर्षांपासून दररोज होत आलेल्या नैसर्गिक भौतिक घटना आहेत व यापुढेही होत राहतील. पृथ्वीच्या परिवलनामुळे तिचा एक भाग साधारणपणे बारा तास अंधारात राहतो त्याच वेळी दुसरा भाग हा तेवढाच वेळ उजेडात असतो. त्यामुळे आपल्याला बारा तास दिवस व बारा तास रात्र अनुभवायला मिळते. परिवलन व परिभ्रमण यांमुळे पृथ्वीवरील अनेक भौतिक प्रक्रियांमध्ये लयबद्धता निर्माण झालेली आहे. याचा परिणाम म्हणून समुद्राला येणारी भरती-ओहोटी, समुद्रकिनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटा, एका पाठोपाठ येणारे ऋतू या सर्वांमध्ये एक लयबद्धता असल्याचे आपणास दिसते.
जैविक घड्याळ म्हणजे काय | What is Biological clock?
माणूस हा सुद्धा निसर्गाच आपत्य आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीव (मानवासहित) हे पृथ्वीवर होणाऱ्या या दिवस व रात्र यांच्याशी त्यांनी जुळवून घेतलेले आहे म्हणजेच त्यांच्यात adaptation झालेले आहे. नैसर्गिक भौतिक घटनांना जुळून घेण्याकरिता सजीवांमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये लयबद्धता दिसून येते त्यास जैविक लयबद्धता अथवा बायलॉजिकल रिदम असे म्हणतात. त्याचाच एक भाग म्हणून सर्व सजीवात वातावरणातील बदल, दिवसाचा वेळ, तापमान किती आहे, हे तपासणारी निसर्गतः त्यांच्यामध्ये तयार झालेली क्षमता आहे, या क्षमतेला जैविक घड्याळ असे म्हणतात. आपल्या शरीरात अंतर्गत जैविक घड्याळ आहे जे आपल्याला निसर्गातील होणार्या बदलांची म्हणजेच वेळ व तापमान यांचे आपल्याला आपोआप जाणीव करून देतात. हे कार्य मेंदू द्वारे केले जाते.
प्राण्यांमध्ये त्यांचा मेंदू हा झोप व जाग यांचे चक्र नियंत्रित करणारा अवयव आहे. मेंदूमध्ये अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचे नियंत्रण असते त्यात मुख्यत्वेकरून झोप व जाग या चक्राचे नियंत्रण मेंदूच्या हायपोथॅलॅमस या भागात असते. सस्तन प्राण्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं जैविक घड्याळ हा त्यांच्या मेंदूमध्ये असतो. मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस या भागात असणारा सुपराकायस्मटीक न्यूक्लियस (SCN) लयबद्धतेवर काम करणारा मास्टर क्लॉक असतो.
पृथ्वीच्या प्रत्येक 24 तासाला फिरण्यामुळे पृथ्वीवर अनेक बदल होत असतात व त्यामुळे जीवसृष्टीवर त्याचे पडसाद उमटतात. प्रकाश, तापमान, अन्न उपलब्धता, या घटकांवर परिणाम होतो, त्यानुसार उत्क्रांतीच्या टप्प्यात दिनचर व निशाचर प्राणी यांच्यामध्ये पण काही बदल झालेले आहेत. दिवसा कार्यक्षम, दक्ष, असणारे दिनचर सजीव प्राणी रात्री त्यांची कमी कार्यक्षमता होते. त्याच्या अगदी उलट, रात्रीच्यावेळी निशाचर प्राण्यांमध्ये सुंदर अशा रीतीने रात्री मध्ये संचार करून आपले अन्न, भक्ष्य शोधून घेण्याची क्षमता यांच्यामध्ये विकसित झालेली आहे.
सुद्रुढ आरोग्यासाठी झोप महत्वाची ( जैविक घड्याळ )
मानवी शरीरातल्या चयापचयाच्या प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी व सुद्रुढ आरोग्यासाठी झोप महत्वाची आहे. निद्रानाश किंवा झोप न येणे ही अलीकडची एक गंभीर समस्या बनत चालली आहे. व्यवस्थित झोप न येणे, अपुरी व अवेळी झोप याच्या मुळे खूप सारे घातक परिणाम हे आपल्या आरोग्यावर दिसून येतात.
व्यवस्थित झोप न आल्यामुळे मधुमेह, निद्रानाश होऊ शकतो. अत्यंत वेगाने ट्वेंटी फोर बाय सेव्हन (24/7 )चालणारी आपल्या आधुनिक बदलत्या जीवनशैलीचा झोपेवर परिणाम होत असतो. सूर्याचे उगवणे आणि मावळणे यानुसार आपल्या शरीरात दोन भिन्न प्रकारच्या शरीरक्रिया नेहमी घडत असतात.
दिवसा होणारे शरीरक्रिया (डे टाईम फिजिओलॉजी)
जेव्हा सकाळी सूर्य उगवतो लख्ख उजेडामुळे आपल्या शरीराला आपोआप दिवसाची जाणीव होते व दिवसा होणारी शरीरक्रिया कार्यान्वित होते ज्यामुळे आपल्याला दक्ष, सक्रिय वाटायला लागतो, आपल्याला भुकेची जाणीव व्हायला लागते व आपल्या शरीराचे तापमान वाढते इत्यादी.
रात्री होणारी शरीरक्रिया (नाईट टाईम फिजिओलॉजी)
जेव्हा सूर्य मावळते अंधार पडायला लागतो तेंव्हा रात्रीची शरीरक्रिया म्हणजे नाईट टाईम फिजिओलॉजी कार्यान्वित होते. आपल्या शरीराचे तापमान कमी होते, दक्षापणा कमी होते आणि आपल्याला झोपेची संवेदना उत्कट होत जातात व आपल्याला गाढ झोप लागते.
उजेड आणि अंधार या दोघांचा झोपेवर परिणाम होतो
उजेड आणि अंधार या दोघांचा झोपेवर परिणाम होतो. सकाळी पहाटे लवकर जर उजेडात आपण आलो तर आपल्याला प्रसन्न वाटते शरीरामध्ये व मनामध्ये नवीन चेतना उमेद जागृत होते व नंतर आपल्याला दिवसभर दक्ष, ऊर्जामय आणि जागेपणा जाणवतो. हाच उजेड किंवा प्रकाश जर आपण रात्री घेतला तर आपल्याला दक्षपणा जाणवेल परंतु याचे खूप सारे झोपेवरती गंभीर परिणाम दिसून येतात.
रात्री प्रकाशात झोप येणे होते कठीण
रात्री उशिरा बराच वेळ प्रकाशात जर तुम्ही बसलात तर तुम्हाला लवकर झोप येणे कठीण होईल तुम्हाला लवकर झोप यायला खूप वेळ लागेल आणि जर तुम्ही अपुऱ्या अंधारात झोपलात तर तुम्हाला मध्ये मध्ये जाग येत राहील व त्यामुळे तुमची झोपमोड होत राहील. जेव्हा उजेड किंवा प्रकाश नसतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक महत्त्वपूर्ण सिग्नल दिला जातो की आता आपल्या शरीराची विश्रांती घेण्याची वेळ आली आहे.
शरीरात सर्वात जास्त मेंदूला विश्रांतीची गरज असते.
जसे आपण आधी पाहिल्याप्रमाणे प्राण्यांमध्ये त्यांचा मेंदू हा झोप व जाग यांचे चक्र नियंत्रित करणारा अवयव आहे आणि मेंदूमध्ये अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचे नियंत्रण असते, त्यात मुख्यत्वेकरून झोप व जाग यांचे नियंत्रण मेंदूच्या हायपोथॅलॅमस या भागात असते. व्यवस्थित व वेळेवर झोप यावी यासाठी नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये झोपे वर काम करणारे एक जैविक घड्याळ असते. हा जैविक घड्याळ आपल्याला येणारी झोप व जाग येण्याचे चक्र नियंत्रित करण्याचे काम करतो. आपल्या झोपेचा वेळ आणि झोपेची गुणवत्ता या दोघांचे नियंत्रण या झोपेच्या घड्याळाकडे असते.
रात्रीच्या गाढ झोप येण्यासाठी मेलाटोनिन हे संप्रेरक कारणीभूत असते ( जैविक घड्याळ)
मेलाटोनिन हे बहुत करून रात्रीच्या वेळेमध्ये बनते आणि दिवसा ते बनत नाही मेलाटोनिन ट्रिप्टोफॅन नामक अमिनो असिड पासून बनतो. ट्रिप्टोफॅन पासून प्रथम सिरोटोनिन बनते व नंतर सिरोटोनीन चे मेलाटोनीन मधे रूपांतर होते. रात्री गाढ झोप येण्यासाठी मेलाटोनिन हे संप्रेरक कारणीभूत असते
मेलाटोनिन हे संप्रेरक नैसर्गिकरित्या आपल्या शरीरात बनते. संध्याकाळ झाल्यावर जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा नैसर्गिक प्रकाश कमी कमी होत जातो व दिवसाची वाटचाल गर्द अंधाराकडे सुरू होते व आपले डोळे हे अंधाराची नोंद घेतात तेव्हा त्याच वेळी आपल्या मेंदूमधील पीनियल ग्रंथी मलाटोनिन (melatonin ) नावाचे एक संप्रेरक बनवते. मेलाटोनिन संप्रेरकाचे रात्रीच्या शरीरक्रियेमध्ये (नाईट टाईम फिजिओलॉजी) मध्ये महत्त्वाचा वाटा असतो. हा मेलाटोनिन संप्रेरक आपली झोप व जागेपणा या दोन गोष्टींना नियंत्रित करतो. मेलाटोनिन तयार होण्यासाठी गडद अंधारा लागतो. ह्या संप्रेरकाचे शरीरामध्ये खूप सार्या जैविक कार्यांमध्ये महत्त्वाचा सहभाग आहे.
जाणून घ्या, पुरेशी झोप घेण्याचे चमत्कारिक फायदे | Benefits of well sleep in Marathi