भटक्यांची भाकर – कविता | Bhatkyanchi Bhakar poem.
भटक्यांची भाकर ही कविता श्री. शंकर आडे यांनी लिहिली आहे.
भटक्यांची भाकर या रचनाकारच्या लेखकाबाबत माहिती
भटक्यांची भाकर कविता रचनाकारचे – श्री. शंकर आडे
राहणार – पोहरादेवी जि.वाशीम
मोबाईल :- 8805955061.
लेखक हे गेल्या 30 वर्षा पासून भटक्या विमुक्त जाती जमाती साठी काम करत आहे. सोबतच 35 वर्षांपासून पत्रकारिता म्हणून ही कार्यरत आहे. सुरवातीचे 12 वर्ष लोकसत्ता या दैनिकात पोहरादेवी ,मानोरा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. सध्या सेवाभूमी हे साप्ताहिक चालवीत आहे.
भटक्यांची भाकर -कविता
पिठाच्या दुधावर जगलो आम्ही
आम्हा खऱ्या दुधाचे चव कळलीच नाही ।
भाकर आसवात भिजवून खाल्ली
आमटी आम्हा केव्हा गावलीच नाही।
पंगतीतील उष्टे तुकडेच नशिबी
पुरी भाकर केव्हा भेटलीच नाही।
सुया, फुगे देऊन मागीतली भाकर
चूल आमची कधी पेटलीच नाही।
पोटच्या पोरीला दोरीवर नाचविणारे आम्ही
तुमच्या इशाऱ्यावर कसे नाचलो हे कळलेच नाही।
साप ,माकड अस्वल खेळविणारे आम्ही
तुमचे गुलाम केव्हा झालो कळलेच नाही।
हात पाहून आम्ही तुमचे भविष्य सांगितले
ललाटाचे भाग्य आमचे कधी उजळलेच नाही।
चिखल तुडवित आम्ही तुमचे घरे बांधली
पाल आमच्या नशीबातून सुटलीच नाही।
दगडात देव घडविणारे आम्ही
नैवदाचे हक्कदार कधी बनलोच नाही।
आम्ही घडविलेले देवीदेवता
तुमचेच केव्हा झाले हे आम्हा कळलेच नाही।