ज्ञानोदय | What is Enlightenment.
ज्ञानोदय याचा शब्दशः अर्थ म्हणजे पुनरुज्जीवन, नवनिर्माण होय. कशाचे पुनरुज्जीवन, नवनिर्माण तर बुरसटलेली विचारसरणीचे, पारंपारिक दृष्टिकोणाचे. ज्ञानोदय म्हणजे १७ शतक ते १८ वे शतक या काळांतील बौद्धिक, प्रबोधनात्मक चळवळ होय.या संकल्पनेचा काही व्यापक अर्थ समजून घेऊयात.
ज्ञानोदय म्हणजे काय? | What is Enlightenment
ज्ञानोदय म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण विचारांचा संच होय. या विचारसंचात विवेक, मुक्ती, विज्ञान, सार्वत्रिकता, प्रगती, वैयक्तिकता, सहिष्णुता, स्वातंत्र्य, मानवी स्वरूपातील सारखेपणा धर्मनिरपेक्षता इ.चा अंतर्भाव होतो. तसेच ती समाज आणि निसर्ग अथवा सृष्टी याविषयीचे पारंपरिक-धर्मनिष्ठ दृष्टिकोन बदलवणारी आहे.
विविध देशांच्या, विविध विचारवंतांना सुसंवादाने परस्परांना जोडणारी, परस्पर प्रभाव घडविणारी एक प्रक्रिया आहे.
ज्ञानोदय म्हणजे नवी शिक्षण केंद्रे, विचारवंत घडविणारी संस्था, समूहांची, विचारशाखांची निर्मिती करणारी प्रेरक परिस्थिती होय.
या काळात पॅरिस, एडीबरो, ग्लासगो, लंडन इ. विचारकेंद्रे म्हणून उदयाला आली; त्यांनी चिकित्सक अभ्यासाचे काम केले.
ज्ञानोदय ही ज्ञाननिर्मितीतील नवी प्रक्रिया, बौद्धिक फॅशन, नवता निर्माण करणारी प्रेरणा होय.
वैज्ञानिकता तर्कसंगतता यांच्या आधारे अभ्यासदृष्टी निर्माण करणारी अभिव्यक्ती या काळात झाली. अभ्यास शब्दकोश, विश्वकोश, लायब्ररी, वाचन-लिखाण, संस्कृती ही त्याचीच रूपे होत.
ज्ञानोदय हा वैश्विक दृष्टिकोन घडविणारा कालखंड होय. या काळात नव्या श्रद्धा, नवी मूल्ये यांच्या आधारे नव्या संस्था, व्यवस्था निर्माण झाल्या.
ज्ञानोदयकालीन काही विचारवंत
रेने देकार्त, जॉन लॉक, न्यूटन, थॉमस मूर, हॉब्ज, इमॅन्युअल कान्ट, गटे, वॉल्टेअर, रुसो, मॉन्टेस्क्यू, स्पिनोझा, लिबनिझ, गॅलिलिओ, अंडम स्मिथ |
या विचारवंतांनी तत्कालीन युरोपीय समाजातील सामाजिक-सांस्कृतिक जीवनातील विसंगती, वैगुण्ये, अनिष्ट प्रथा, समस्या, मूल्ये, राज्य, शासन इ यांची उकल आपल्या विचार साहित्यातून केली. नव्या मूल्यांचा, बुद्धिप्रामाण्यवाद, तर्क आणि चिकित्सा यांच्याआधारे समस्यांवर पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला.
ज्ञानोदय या बौद्धिक, वैचारिक चळवळीचा परिणाम आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल
- धर्माच्या मक्तेदारीला आळा घातला गेला
- दैववादाला नकार दिला गेला आणि धर्म हि वैयक्तिक बाब समजली गेली.
- सरंजामदार, उमराव, राजे, धर्मगुरू यांच्या प्रदत्त अधिसत्तेला नकार दिला गेला आणि प्रातिनिधिक शासनप्रणालीचा विचार पुढे आला.
- मानवता आणि मुक्तीचा पुरस्कार करण्यात आले.
- परंपरागत मूल्ये, अनिष्ट प्रथा, पोथीनिष्ठा यांना विरोध केला गेला.
- वस्तुनिष्ठ पुराव्याच्या व वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे वास्तवाचे आकलन करून गोष्टी स्वीकारण्यास सुरुवात झाली.
- मानवाच्या नैसर्गिक हक्क अधिकारांचा पुरस्कार करण्यात येऊ लागले
- व्यक्तिस्वातंत्र्य, सहानुभूती, नागरी स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला गेला.
- ज्ञान-अज्ञानाची पुनर्जाणीव (व्यासंगी अज्ञान ) जितके ज्ञान अधिक मिळवावे तितके आपले अज्ञान अधिक असल्याचे जाणवते.” ही जाणीव प्रबोधनाची प्रेरणा होती.
- अन्याय, पिळवणुकीपासून मुक्तीचा ध्यास विचारवंतानी घेतला होता. जुन्या चालीरीतीवर परखड टीका होण्यास सुरुवात झाली.
- ज्ञानाचे, विवेकाचे पुनरुज्जीवन होऊन नव समाजनिर्मितीला सुरवात झाली.
- जग बदलण्याचा ध्यास या चळवळीने घेतला होता.
- ऐहिकवादाचा विकास- “स्वर्गापेक्षा पृथ्वी महत्त्वाची आणि देवापेक्षा माणसे.” काल्पनिक गोष्टीपेक्षा वस्तुस्थिती महत्व आले.
- स्व-विषयक जाणिवांचा विकास झाला.
- प्रजाचे रुपांतर नागरिक मध्ये करण्याचे काम या चळवळीने केले आणि त्याप्रकारच्या जाणिवेचा विकास होण्यास मदत झाली.
थोडक्यात ज्ञानोदय………… करिता दिलेली प्रतिक्रिया होती
एकूणच विचार, समाजधारणा आणि शास्त्रे-पद्धती यांच्यात आमूलाग्र परिवर्तनाची ज्ञानोदय क्रिया-प्रक्रिया ही मध्ययुगीन जीवनातील धर्मांधता, पिळवणूक, दडपणूक, विषमता, विचार स्वातंत्र्याचा अभाव, परंपरावादी मानसिकता, अनिष्ट प्रथा व कर्मकांड इ. सर्वांना दिलेली विलक्षण प्रतिक्रिया होती.
ज्ञानोदयमुळे सरंजामशाही समाजव्यवस्थेकडून आधुनिक भांडवलशाही समाजव्यवस्थेकडे समाजाची वाटचाल सुरु झाली
ज्ञानोदय काळातील या बौद्धिक बंडखोर परिवर्तनामुळे सनातनता, परंपरा यांना नकार आणि बुद्धिप्रामाण्यवादी, अनुभवनिष्ठ शास्त्रीय संशोधनाला चालना मिळाली. यामुळे युरोपीय समाज हा मध्ययुगीन कालखंडातील पारंपरिक समाजातून म्हणजेच सरंजामशाही समाजव्यवस्थेकडून आधुनिक भांडवलशाही समाजव्यवस्थेकडे जावू शकले. हे बदल समाजशास्त्राच्या उदयालाच नव्हे तर सर्वच विज्ञानांच्या विचारविश्वाला धक्का देणारे, त्यांच्यात बदल घडविणारे ठरले होते.
ज्ञानोदय (Enlightenment) हा युरोपातील समाजजीवनात उलथापालथ घडविणारा असा कालखंड
तुम्हांला आता समजले असेल की, १५ वे शतक ते १८ वे शतक हा कालखंड युरोपातील समाजजीवनात उलथापालथ घडविणारा असा होता. या कालखंडात प्रोटेस्टंट धर्म सुधारणा चळवळ, ज्ञानोदय चळवळ, अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती अशा सामाजिक, आर्थिक, राजकीय घटनांनी युरोपातील या स्थित्यंतराला गतिमान केले. युरोपियन समाजाला मध्ययुगातून आधुनिक भांडवलशाही युगात आणले. या घटना परस्परांशी काळ, आशय आणि परिणामांच्या बाबतीत एकमेकांना छेदणाऱ्या अशा होत्या. त्यांपैकी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे ‘फ्रेंच राज्यक्रांती’ होय.
If you’re curious about the concept of ‘What is Enlightenment,’ you can watch our video here to gain a deeper understanding of this philosophical and historical movement.
हे ही वाचा:- फ्रेंच राज्यक्रांती भाग -1| French Revolution Part-1
वरील पोष्ट संदर्भातील मागील पोष्ट वाचा:– समाजशास्त्राचा उदय एक विद्याशाखा म्हणून कसा झाला | How Sociology Emerged as a Discipline