समाजशास्त्रातील पारिभाषिक शब्दांचे अर्थ व व्याख्या | The meaning and definition of sociological terminology
समाजशास्त्रातील पारिभाषिक शब्दार्थ व व्याख्या | Sociological word terminology
समाजशास्त्र विषय समजून घेताना आपणास अनेक शब्द हे नवीन वाटू शकतात. काही शब्द हे दैनंदिन जीवनात नेहमी वापरतो. जसे कि समाज, संस्कृती, रीतीरिवाज इत्यादी. मात्र अश्या शब्दांचा व्यावहारिक अर्थ वेगळा असतो. अश्या शब्दांचा समाजशास्त्रामध्ये अर्थ वेगळा असतो. समाजशास्त्रातील पारिभाषिक शब्दांचा संग्रह त्याचे अर्थ व व्याख्या आपणास येथे मिळेल.
अंतर्विवाह
विशिष्ट समूहाच्या सदस्यांनी ‘ जातीं अंतर्गत म्हणजेच आतल्या आत केलेला विवाह. उदाहरणार्थ पोटजात, जाती अंतर्विवाही आहेत . तसेच पंथ , धर्म , प्रदेश , भाषागट ,वंश ( Race ) ह्या आधारे अंतर्विवाहाचा विचार करण्यात येऊ शकतो.
बहिर्विवाह
विशिष्ट समूहाला सोडून दुसऱ्या समूहातून केलेली वर / वधूची निवड. उदाहरणार्थ , कुल हे बहिर्विवाही संघटन आहे. कुटुंब , वंश बर्हिविवाही होत. कारण त्यांना ‘ एकाच रक्ताचे ‘ मानले जाते.
पोटजाती
डॉ . इरावती कर्वे यांनी पोटजातीला ‘ नातेवाइकांचा समूह ‘ असे म्हटले आहे. त्यांनी जातींना पोटजातीचा समुच्चय म्हणून निर्देशिले आहे . उदाहरणार्थ , ब्राह्मण जात आणि देशस्थ , कोकणस्थ ह्या पोटजाती.
ग्रामीण स्तरीकरण
ग्रामीण समाजजीवनाची उच्च निम्न स्तरांत झालेली विभागणी; हे स्तरीकरण जात, संपत्ती, सत्तेच्या आधारे होते. बलुतेदारी ग्रामीण समुदायातील जाती-जातींमध्ये अन्नधान्य, सेवा व वस्तूंचे आदान- प्रदान करण्यावर आधारित व्यवस्था.
जातपंचायत
जातीतील सदस्यांच्या वर्तनाचे नियमन व ‘नियंत्रण करणारी यंत्रणा जातिसदस्यांतील कोणतेही बाद, समस्या सोडवून न्यायदानाचे कार्य करणारी व्यवस्था.
जातिमंडळे
जातीतील अभिजनांनी स्वजातीचा विकास करण्यासाठी स्थापन केलेली मंडळे . उदाहरणार्थ , ब्राह्मण सभा , माळी सभा , इत्यादी
सामाजिक स्तरीकरण
सामाजिक स्तरीकरण जेव्हा समाजाची उच्च निम्न स्तरांत विभागणी झालेली असते त्यास सामाजिक स्तरीकरण म्हणतात.
आवृत स्तरीकरण
ज्या स्तरीकरणाचे सदस्यत्व जन्माने प्राप्त होऊन ते कायम स्वरूपी असते, त्यास आवृत स्तरीकरण म्हणतात. उदा. जातीआधारे स्तरीकरण. जातींचे स्तरीकरण : जातींची श्रेष्ठ-कनिष्ठरित्या झालेली कायम विभागणी .
मुक्त स्तरीकरण
ज्या स्तरीकरणाचे सदस्यत्व सर्वांसाठी असते , त्यास मुक्त स्तरीकरण म्हणतात. उदा.-वर्ग.
ग्रामअंतर्गत संबंध
गावगाड्यातील जाती-घटकांतील संबंध
सामाजिक अंतर
बोगार्डस याने सामाजिक अंतर अनुमापाचा ( Social Distance Scale ) विकास केला आहे . त्यासाठी त्याने एकूण सात प्रश्नांची उत्तरे मिळवून त्या आधारे सामाजिक अंतराची निश्चिती केली आहे.
आंतरग्राम जाती संबंध
गावागावांतील जातींमध्ये असलेले संबंध
मानलेले संबंध
जे संबंध रक्तबंध किंवा विवाहाने निश्चित झालेले नसतात, अशा विभिन्न जाती-धर्मांतील सदस्यांमध्ये असलेले नातेवाचक सामाजिक संबंध.
सामाजिक गतिशीलता :
स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्ती किंवा समूहाची चलनशीलता म्हणजे सामाजिक गतिशीलता होय. सामाजिक गतिशीलता एका सामाजिक स्थानाकडून दुसऱ्या सामाजिक स्थानामध्ये जाण्याच्या क्रियेला सामाजिक गतिशीलता असे म्हणतात.
स्तंभीय गतिशीलता
सामाजिक स्तरीकरणात उच्च स्थानाकडून निम्न किंवा निम्न स्थानाकडून उच्च स्थानाकडे असलेली चलनशीलता.
ऊर्ध्वगामी गतिशीलता
खालच्या स्तरातील व्यक्ती किंवा समूहाची त्यापेक्षा उच्चस्तराप्रत झालेली चलनशीलता.
अधोगामी गतिशीलता
सामाजिक स्तरीकरणातील वरच्या स्तराकडून त्याच्यापेक्षा निम्न स्तराप्रत व्यक्ती किंवा समूहाची चलनशीलता .
संस्कृतीकरण
डॉ . एम . एन . श्रीनिवास यांनी मांडलेली – संकल्पना ‘ संस्कृतीकरण ही अशी प्रक्रिया असते की ज्यात निम्न जाती किंवा आदिवासी किंवा इतर समूह वरच्या समूह, जाती किंवा ब्राह्मण जातीला संदर्भसमूह मानून त्याप्रमाणे आपल्या प्रथा, विधिविधाने, विचार प्रणाली आणि जीवनरीतींत परिवर्तन करतात.
पाश्चिमात्यीकरण
दीर्घ काळापर्यंत पाश्चिमात्य समाजाशी आलेल्या सांस्कृतिक संपर्कातून पाश्चिमात्य नसलेल्या समाजात तंत्रज्ञान, संस्था, विचारसरणी आणि मूल्यांत झालेला बदल म्हणजे पाश्चिमात्यीकरण होय.
समाज
समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे होय.
समाजशास्त्र
समाजशास्त्र सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र होय.
स्वरूपप्रधान विचार संप्रदाय
खगोलशास्त्र , वनस्पतिशास्त्र यांच्याप्रमाणे समाजशास्त्रदेखील विशेषित शास्त्र आहे. असे मानणारा संप्रदाय.
समन्वयात्मक विचारसंप्रदाय
समन्वयात्मक विचारसंप्रदाय समाजशास्त्र हे अन्य विशेषित सामाजिकशास्त्रांमध्ये समन्वय साधणारे शास्त्र आहे , असे मानणारे शास्त्र,
सामाजिकीकरण
समाजात राहून कळत-नकळत औपचारिकपणे शिकण्याची प्रक्रिया.
यजमान
भूमीवर मालकी असणारा आणि बलुतेदाराकडून सेवा व वस्तूच्या मोबदल्यात अन्नधान्य व इतर वस्तू देणारा वर्ग.
बलुतेदार
ग्रामीण जीवनात यजमानांचे ज्यांच्यापासून ते अशा जातींचा समुच्चय.
अलुतेदार
ग्रामीण जीवनात नैमित्तिक गरजा भागविणाऱ्या जाती.
सहयोग या समाजशास्त्रातील पारिभाषिक शब्दाचा अर्थ
समान स्वरूपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी दोन व्यक्तींनी केलेले प्रयत्न म्हणजेच सहकार्य.
समायोजन
सहमत होण्यासाठी केलेला समझोता, संघर्ष किंवा विरोध टाळण्याची प्रक्रिया.
संस्कृती
मानवाची जीवन जगण्याची पद्धती
मूल्ये
चांगले-वाईट, योग्य-अयोग्य असा भेद दर्शविणारी मानके.
लोकाचार
समाजसदस्यांमध्ये सर्वमान्य झालेले सामाजिक वर्तनविषयक विचार.
प्रथा
विशिष्ट कार्य करण्याच्या समाजाने मान्य केलेल्या पद्धती.
सामाजिक व्यवस्था
विशिष्ट कार्यामुळे एकमेकांशी जोडल्या गेलेल्या व परस्परांवर अवलंबून असणाऱ्या घटकतत्त्वांमधील संबंधांची पद्धती म्हणजे सामाजिक व्यवस्था होय . सामाजिक व्यवस्था या संकल्पनेत व्यवस्था निर्माण करणाऱ्या घटकांचे परस्परावलंबित्व व संतुलन या दोन गोष्टींवर अधिक भर आहे.
स्थलांतर
आपले मूळ निवासस्थान ( गाव ) सोडून अन्यत्र राहण्यासाठी जाणे म्हणजे स्थलांतर होय.
सामाजिक न्याय
समाजात ज्या वस्तूंची व सेवांची निर्मिती होते त्यांचे वितरण संपूर्ण समाजात रास्त व योग्य प्रकारे झाले पाहिजे. सर्वांच्या अन्न , वस्त्र , निवारा या प्राथमिक गरजा भागल्याच पाहिजेत, अशी स्थिती निर्माण होणे म्हणजे सामाजिक न्याय होय.
सामाजिक चळवळी
सामाजिक चळवळी समाजजीवनाच्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा नवीन व्यवस्था ( Order ) निर्माण करण्याच्या हेतूने प्रेरित झालेल्या लोकांची सामूहिक कृती म्हणजे सामाजिक चळवळ.
सामाजिक सुरक्षा
सामाजिक सुरक्षा आकस्मिक संकटांविरुद्ध व्यक्तीला संरक्षण देण्याच्या हेतूने समाजाने निश्चित केलेला सामाजिक सुरक्षा हा एक कार्यक्रम आहे
हितसंबंधी गट
समान हितसंबंधांच्या आधारावर एकत्र येऊन निर्माण झालेल्या संघटनेला अथवा गटाला हितसंबंधी गट असे म्हणतात.
दबाव गट
आपल्या सभासदांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी शासनाने अनुकूल निर्णय घ्यावा किंवा धोरण ठरवावे किंवा विधिनियम करावा या हेतूने जेव्हा हितसंबंधी गट प्रयत्न करतो तेव्हा दबाव गट निर्माण होतो.
कुल किंवा गोत्र
आपला पूर्वज ( मूळ पुरुष ) एकच वा समान आहे अशी भावना असणाऱ्या अनेक कुटुंबांचा समुच्चय म्हणजे कुल किंवा गोत्र होय.
युवागृहे किंवा शयनगृहे
केवळ आदिवासी जमातींमध्येच युवागृहे ही संघटना आढळून येते. युवक व युवतींना ( चार – पाच वर्षांपासून विवाह होण्यापर्यंतची जीवनातील अवस्था म्हणजे युवावस्था असे आदिवासींमध्ये मानले जाते.) एकत्रितपणे किंवा स्वतंत्रपणे रात्रीचा वेळ घालविण्यासाठी निर्माण झालेल्या व्यवस्थेला युवागृह किंवा शयनगृह असे म्हणतात.
वितरणात्मक न्याय
व्यक्तीला मिळणारे उत्पन्न हे तिचे स्वतःचे नसून संपूर्ण समाजाचे आहे, त्यामुळे तिने ते स्वतः पाशी किती ठेवावे हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार समाजाला आहे. हे वितरणात्मक न्यायाच्या संकल्पनेचे आधारभूत सूत्र आहे.
पुनरुत्थान ( Renaissance )
प्राचीन आणि आधुनिक काळाच्या दरम्यानचा युरोपातील एक संक्रमणात्मक काळ. हा काळ १४ व्या शतकात इटालीत सुरू झाला आणि १७ व्या शतकात संपला, असे मानतात. या काळात अभिजात साहित्य, कला यांचे पुनरुज्जीवन झाले आणि विज्ञानाची भरभराट झाली. साहस आणि विविध शोधांचा हा काळ होता. अनेक खंडांचा शोध, खगोलशास्त्रातील संशोधन, कागद, छपाई, खलाशांचे दिशादर्शक यंत्र, बंदुकीची पावडर यांचा या काळात शोध लागला. बऱ्याच काळापासूनच्या सांस्कृतिक न्हास आणि साचलेपणानंतर आलेला हा अभिजात अध्ययन आणि शहाणपण यांचा काळ होता.
अनुभववाद ( Empiricism ) या समाजशास्त्रातील शब्दाची व्याख्या आपणास पुढील प्रमाणे करता येईल.
बहुतेक शास्त्रज्ञांचा हा तात्त्विक दृष्टिकोन असतो. ज्ञानेंद्रियांद्वारे ( कान, डोळे, जीभ, त्वचा, नाक) मिळालेल्या माहितीच्या साहाय्याने प्रश्नांची उत्तरे देण्याचा अनुभववाद्यांचा ( empiricists ) प्रयत्न असतो . केवळ तर्क किंवा धार्मिक वा राजकीय व्यक्तींनी विविध प्रश्नांची उत्तरे देणे हा दृष्टिकोन त्यांना अमान्य असतो. आपण अनुभवू शकत नाही, अशा गूढ संकल्पना ते नाकारतात. उदा. आत्मा.
धर्मशास्त्र (Theology)
यात ईश्वराचे वर्णन आणि त्याचे तथाकथित स्वरूप यांचा तद्वतच धार्मिक श्रद्धांचा अभ्यास.
वंश
समान शारीरिक लक्षणांचा मानवी समूह
मातृसत्ताक कुटुंब ( Matriarchal Family )
माता ही कुटुंबप्रमुख असते , मातेच्या नावाने वंश चालतो.
पितृसत्ताक कुटुंब ( Patriarchal Family )
पिता कुटुंबप्रमुख असतो. पित्याच्या नावाने वंश चालतो.
संयुक्त कुटुंब ( Joint Family )
ज्या कुटुंबात दोन किंवा त्यापेक्षा अधिक पिढ्यांचे लोक एकत्र राहतात.
विभक्त कुटुंब / मूल कुटुंब ( Nuclear Family )
ज्या कुटुंबात आईवडील व त्यांची अविवाहित मुले राहतात.
बहुपतित्व
एका स्त्रीने एकापेक्षा अधिक पुरुषांशी विवाहबद्ध होणे.
बांधविक बहुपतित्व
ज्या वेळेस एक स्त्री एकापेक्षा अधिक पुरुषांशी विवाहबद्ध होते व ते पुरुष एकमेकांचे भाऊ असतात.
अबांधविक बहुपतित्व
ज्या वेळेस एक स्त्री एकापेक्षा अधिक पुरुषांशी विवाहबद्ध होते, पण ते पुरुष एकमेकांचे भाऊ नसतात.
एकविवाह ( Monogamy )
एक पुरुष व एक स्त्री यांच्यात झालेला विवाह.
बहुविवाह ( Polygamy )
एक स्त्री व अनेक पुरुष यांच्यात झालेला विवाह किंवा एक पुरुष व अनेक स्त्रिया यांच्यात झालेला विवाह.
बहुपतित्व ( Polyandry )
एका स्त्रीने एकाचवेळी एकापेक्षा अधिक पुरुषांशी विवाह करणे.
बहुपत्नीत्व ( Polygymy )
एका पुरुषाचा एकापेक्षा अधिक स्त्रियांशी झालेला विवाह
बांधविक बहुपतित्व ( Fraternal Polyandry )
एक स्त्री जेव्हा एकापेक्षा अधिक पुरुषांशी विवाहबद्ध होते व ते पुरुष एकमेकांचे भाऊ असतात.
अबांधविक बहुपतित्व ( Non – fraternal Polyandry )
ज्या वेळेस एक स्त्री एकापेक्षा अधिक पुरुषांशी विवाहबद्ध होते, पण ते पुरुष एकमेकांचे भाऊ नसतात.
अंतर्विवाह ( Endogamy )
व्यक्तीने विवाहातील जोडीदाराची निवड आपल्याच गटात करणे.
बहिर्विवाह ( Exogamy )
व्यक्तीने विशिष्ट गटाबाहेरील व्यक्तीची विवाहातील जोडीदार म्हणून निवड करणे .
अनुलोम विवाह ( Hypergamy )
उच्चवर्णीय पुरुष व कनिष्ठवर्णीय स्त्री यांच्यातील विवाह
प्रतिलोम विवाह ( Hypogamy )
प्रतिलोम विवाह ( Hypogamy ) : उच्चवर्णीय स्त्री व कनिष्ठवर्णीय पुरुष यांच्यातील विवाह
वधूमूल्य
वरपक्षाकडून वधूपक्षाला रक्कम किंवा वस्तुरूपाने दिला जाणारा मोबदला
या समाजशास्त्रातील विविध अश्या पारिभाषिक शब्द हे न संपणारे आहेत.