समाजशास्त्रातील मुलभूत संकल्पनांच्या व्याख्या व अर्थ | Definitions & Meanings of basic concepts in sociology
नमस्ते मित्रांनो, तुम्ही जगातील कोणताही विषयाचा अभ्यास करा, जोपर्यत तुम्ही त्या विषयातील विविध संकल्पना, शब्द, संबोध व त्यांचा अर्थ आपणास ज्ञात होत नाही, तोपर्यत तो विषय समजने अथवा त्यात प्राविण्य मिळवणे हे कठीण असते. हे समाजशास्त्र विषयास हि लागू पडते. समाजशास्त्राच्या अभ्यास करणाऱ्यांनी प्रथम या शास्त्रातील विविध संकल्पनेचे अर्थ समजून घेणे गरजेचे असते. समाजशास्त्रातील शब्दांना खास समाजशास्त्रीय असा अर्थ असते. समाजशास्त्राची परिभाषा हि अनेक समाजशास्त्रीय संकल्पनांनी बनलेली आहे. समाजशास्त्रातील संकल्पना पाहण्याच्या आधी आपण संकल्पना म्हणजे काय हे समजावून घेऊ.
सदरची समाजशास्त्रातील मुलभूत संकल्पनांच्या व्याख्या व अर्थ हि पोस्ट “समाजशास्त्रातील मुलभूत संकल्पना” या लेखक:- डॉ. सर्जेराव साळुंखे यांच्या प्रोफिशनट पब्लिकेशन हाउस द्वारे प्रकाशित केलेल्या पुस्तकातील आहे. |
What is Concept? | संकल्पना म्हणजे काय?
एखाद्या गोष्टीचे, विविध गोष्टींमधील परस्परसंबंधाचे किंवा एखाद्या प्रक्रियेचे स्वरूप नेमकेपणाने स्पष्ट करण्यासाठी योजला जाणार शब्द किंवा शब्दसंच म्हणजे संकल्पना होय. संकल्पना या अमूर्त असतात. अनुभवलेल्या किंवा निरीक्षण केलेल्या घटना किंवा तथ्यांचे नेमके स्वरूप व लक्षणे साररुपात व्यक्त करण्यासाठी संकल्पना तयार केल्या जातात.
समाजशास्त्र म्हणजे काय? | What is Sociology? |समाजशास्त्राची व्याख्या | Definition of Sociology.
समाजशास्त्राला इंग्रजीमध्ये ‘ Sociology‘ अशी संज्ञा आहे. ‘Sociology‘ ही संकरित संज्ञा असून ती लॅटिन भाषेतील ‘ Socius ‘ म्हणजे सहचर ( Companion ) आणि ग्रीक भाषेतील logos ‘ म्हणजे उच्च पातळीवरील अभ्यास किंवा शास्त्र, या दोन शब्दांपासून तयार झाली आहे. म्हणून व्युत्पतिशास्त्रदृष्ट्या ‘Sociology’ या शब्दाचा अर्थ, मानवा मानवातील साहचर्याचा अमूर्त पातळीवरील अभ्यास करणारे शास्त्र, असा लावता येईल.
मानवा मानवातील साहचर्यात्मक स्वरूपाच्या परस्परसंबंधातूनच मानवी समाजाची निर्मिती होत असल्याने, समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र, असे म्हणता येईल . समाजशास्त्र म्हणजे काय हे समजून घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे शब्दकोशातील ‘Sociology’ या शब्दाचा अर्थ पाहणे. विविध शब्दकोशांत ‘Sociology’ या शब्दाचा अर्थ भिन्न-भिन्न शब्दात दिला असला तरी सर्वसामान्यपणे, मानवी समाजांचा, त्यांच्या उत्क्रांतीचा, संरचनेचा, सामाजिक संबंधांचा आणि सामाजिक संस्थांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र, असा अर्थ शब्दकोशातून पाहवयास मिळतो.
‘समाजशास्त्र’ या संज्ञेच्या सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञांनी दिलेल्या समाजशास्त्राच्या व्याख्या. समाजशास्त्र म्हणजे काय हे समजून घेण्याचा सर्वांत अधिक चांगला मार्ग म्हणजे या व्याख्यांचा अभ्यास करणे होय.
समाजशास्त्राच्या व्याख्या.
1 ) मॅकायव्हर आणि पेज यांच्या मतांनुसार, “सामाजिक संबंध हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय होय.” (“The a subject-matter of Sociology is social relationship as such, “MacIver and Page )
2 ) हॅरी जॉन्सन म्हणतात, “समाजशास्त्र हे सामाजिक समूहांसबंधीचे शास्त्र आहे.” (“Sociology is the science that deals with social groups “- Harry Johnson )
3) हॉर्टन आणि हंट यांच्या मतानुसार, “मानवी सामाजिक जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय . (“Sociology is the scientific study of human social life” – Horton and Hunt )
4)अलेक्स इंकेल्स यांच्या मतानुसार, “सामाजिक क्रिया व्यवस्थांचा आणि त्यामधील आंतरसंबंधांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय.” (“ Sociology is the study of systems of social action and of their interrelations” – Alex Inkeles ).
5) टिशलेर , व्हायटन आणि हंटर यांच्या मते, ” मानवी समाजाचा आणि मानवा-मानवात होणाऱ्या सामाजिक आंतरक्रियांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय.” (“Sociology is the scientific study of human society and the social interactions that emerge among people “Tischler, Whitten & Hunter).
6) मॉरिस गिन्सबर्ग यांच्या मते, “व्यापक अर्थाने, मानवी आंतरक्रिया व आंतरसंबंध, त्यांची कारणे आणि परिणाम यांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय.” ( “In the broadest sense, sociology is the study of human interactions and interrelations, their conditions and consequences.” – Morris Ginseberg ).
7) मॅक्स वेबर म्हणतात , “ सामाजिक क्रियांचे अर्थापनात्मक आकलन करण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय . ‘ ( ” Sociology is the science which attempts the interpretative understanding of social action ” – Max Weber )
8) किंग्जले डेव्हिड त्यांच्या मते. ” समाजशास्त्र हे समाजाविषयीचे सामान्य विज्ञान आहे.” ( “Sociology is a general science of society”).
समाजशास्त्राची प्रातिनिधिक आणि सर्वसमावेशक अशी व्यापक व्याख्या करणे अवघड असले तरी स्थूलपणे पुढील प्रमाणे करता येईल, समाजशास्त्र म्हणजे समूह, सामाजिक संबंध, सामाजिक प्रक्रिया, समाज संरचना, संस्था यांच्यामध्ये घडणाऱ्या मानवाच्या सामाजिक जीवनाचा सुव्यवस्थित आणि चिकित्सकपणे अभ्यास करणारी एक विज्ञानशाखा होय.
सामाजिक आंतरक्रिया म्हणजे काय? | सामाजिक आंतरक्रिया व्याख्या | Definition of Social interaction.
सामाजिक अंतरक्रिया हि समाजशास्त्रातील एक मध्यवर्ती संकल्पना आहे.
1) टिशलेर , व्हायटन आणि हंटर यांच्या मते, “जेव्हा एका व्यक्तीच्या क्रियांचा (वर्तनाचा ) किमान दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या क्रियांवर ( वर्तनावर) प्रभाव पडतो तेव्हा आंतरक्रिया घडून येते.” (“When the actions of one individual affect the actions of at least one other individual, interaction is taking place”. -Tischler , Whitten and Hunter).
2) शेपर्ड, ओडोम आणि ब्रुटन यांच्या मते, “जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती परस्परांचे वर्तन प्रभावित करतात तेव्हा सामाजिक आंतरक्रिया अस्तित्वात येते”. (“Social Interaction exists when two or more persons mutually influence each other behaviour”- Shepard, Odom and Bruton).
3) ड्रेसलर आणि विलिस यांच्या मते, “जेव्हा जेव्हा मानवी व्यक्ती इतर व्यक्तींच्या क्रियांना प्रतिक्रिया करतात तेव्हा घडून येणाऱ्या प्रक्रियेला मानवी आंतरक्रिया असे म्हणतात. (“Human interaction is the process that occurs whenever human beings respond to the actions of other human beings” – David Dressler and William M. Willis Jr.)
4) ब्रूम आणि सेल्झनिक यांच्या मतानुसार, “इतरांची जाणीव ठेवून, आणि इतरांच्या प्रतिक्रियांशी आपल्या प्रतिक्रिया जुळवून घेऊन वर्तन करण्याच्या प्रक्रियेला सामाजिक आंतरक्रिया म्हणतात.” (“The process of acting in awareness of others, and adjusting responses to the way others respond is called social interaction”. -Broom and Selznick ).
5) मेरिल आणि एल्डरेज म्हणतात, “ज्यामध्ये दोन किंवा अधिक व्यक्तींत अर्थपूर्ण सामाजिक संपर्क प्रस्थापित होतो व त्याचा परिणाम म्हणून त्यांची वर्तने थोड्याफार प्रमाणात का होईना बदलतात, अशा सामान्य प्रक्रियेला सामाजिक आंतरक्रिया म्हणतात.” (“Social interaction is the general process whereby two or more persons are in meaningful contact, as a result of which their behaviours are modified however slightly” -Merill and Eldredge).
वरील व्याख्यांवरून थोडक्यात पुढील अर्थ किंवा सामाजिक आंतरक्रियेसाठीच्या पूर्वअटी सागता येईल.
- सामाजिक आंतरक्रिया अस्तित्वात येण्यासाठी किमान दोन व्यक्तींची आवश्यकता असते.
- या व्यक्तींना इतरांच्या अस्तित्वाची जाणीव असणे किंवा त्यांनी एकमेकांची दखल घेणे आवश्यक ठरते.
- या व्यक्तींनी परस्परांना उद्देशून बर्तन करणे आवश्यक आहे.
- आंतरक्रियेत इतरांच्या वर्तनाचा अर्थ कळल्यामुळे व्यक्ती त्यास प्रतिसाद देतात.
- आंतरक्रियेत इतरांच्या प्रतिसादास अनुरूप अशा प्रकारचा व्यक्ती देतात किंवा इतरांच्या वर्तनाशी जुळवून घेणारे वर्तन व्यक्तीकडून घडून येते.
- आंतरक्रियेत दोन किंवा अधिक व्यक्तीत अर्थपूर्ण सामाजिक संपर्क प्रस्थापित होतो.
- अशा अर्थपूर्ण सामाजिक संपर्कामुळे आंतरक्रियेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींची वर्तने परस्परांकडून प्रभावित होतात.
- परिणामी व्यक्तींच्या वर्तनात थोड्याफार प्रमाणात का होईना परिवर्तन किंवा बदल घडून येतो.
- आंतरक्रिया ही एक सामान्य प्रक्रिया असून तिचे स्वरूप प्रतीकात्मक ( Symbolic ) असते. काही उदाहरणे खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येईल.
- एकाने गुड मार्निग केल्यावर दुसऱ्याने ड मार्निग किंवा same to you म्हणणे,
- शिक्षक वर्गात आल्यावर विद्यार्थी उठून उभे राहतात.
- क्रिकेटच्या सामन्यात जिंकण्यासाठी परस्परविरोधी संघांनी शर्थीनी प्रयत्न करणे,
- अतिरेकी व पोलिसांची तुकडी यांच्यात चकमक घडून येणे,
- दोन देशांत लढाई सुरू होणे इ . ही सर्व सामाजिक आंतरक्रियेची उदाहरणे होत. अशी असंख्य उदाहरणे आपल्याला सांगता येतील.
वरील उदाहरणांवरून हे ध्यानात येईल की, एका व्यक्ती वा समूहाने दुसऱ्या व्यक्ती वा समूहास उद्देशून काही वर्तन केल्यावर ती व्यक्तीही त्याला अनुलक्षून काही प्रतिक्रिया करते. अशा प्रकारे दोन किंवा अधिक व्यक्ती वा समूहांमध्ये घडून येणाऱ्या परस्परवर्तनाला सामाजिक आंतरक्रिया म्हणतात.
आंतरक्रिया म्हणजे एकमेकांनी एकमेकांशी वागणे होय. सामाजिक आंतरक्रियेत एका व्यक्तीचे वर्तन उद्दीपक ( stimulus ) असते तर दुसऱ्या व्यक्तीचे वर्तन प्रतिक्रियेच्या ( response ) स्वरूपाचे असते . उद्दीपकाशिवाय प्रतिक्रिया नाही व प्रतिक्रियेशिवाय आंतरक्रिया नाही . आपण एखाद्याला काही विचारले व त्याने त्याची काहीही दखल घेतली नाही ( जाणीवपूर्वक नव्हे ) तर आंतरक्रिया अस्तित्वात येणार नाही. साधारणतः कोणत्याही आंतरक्रियेत उद्दीपकाला केलेली प्रतिक्रिया स्वतः नवीन उद्दीपक बनते व त्याला पहिल्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया होते. म्हणजे आंतरक्रियेत उद्दीपक व प्रतिक्रिया यांची साखळी दिसून येते . म्हणून आंतरक्रिया म्हणजे परस्पर – उद्दीपन व परस्पर प्रतिक्रिया होय.
आंतरक्रियेत एकाच्या वर्तनाने दुसऱ्याचे उद्दीपन होणे याचा अर्थ त्याला पहिल्या व्यक्तीच्या वर्तनाचा अर्थ कळतो . एखाद्या आजारी व्यक्तीला कोणी पुष्पगुच्छ दिला तर ती व्यक्ती त्याचे आभार मानते . या ठिकाणी पुष्पगुच्छ देण्याच्या क्रियेचा अर्थ कळल्यामुळेच आभार मानण्याची प्रतिक्रिया झाली . प्रियकराने गुलाबाचे फूल दिल्यावर प्रेयसी हंसून त्याचा स्वीकार करते . याचा अर्थ असा की , आंतरक्रियेत दोन व्यक्तींमध्ये अर्थपूर्ण सामाजिक संपर्क प्रस्थापित होतो.
आंतरक्रियेत एकमेकांच्या वर्तनाने एकमेकांचे उद्दीपन होते याचाच अर्थ परस्परांचा प्रभाव परस्परांवर पडतो . दुसऱ्याच्या वर्तनाने आपले उद्दीपन होते. म्हणजेच त्याच्या वर्तनाने आपण प्रभावित होतो. हा प्रभाव पडल्यामुळेच आपले वर्तन बदलते . दुसरा माणूस हसला तर आपणही हसतो . पण त्याने अपशब्द वापरले तर मात्र आपल्याला राग येतो व विविध प्रकारे आपण आपला राग व्यक्तही करतो. म्हणजे आंतरक्रियेत दुसऱ्यामुळे आपले वर्तन बदलते.
समाज म्हणजे काय? | What is Society? | समाज व्याख्या | Definition of Society.
सामान्य माणूस दैनंदिन व्यवहारात ‘समाज’ हा शब्द अगदी सैलपणे, ढोबळ व प्रसंगानुरूप बदलणाऱ्या अर्थाने वापरतो.
उदा . ‘महाराष्ट्रीय समाज , ‘गुजराथी समाज’ या शब्दप्रयोग प्रादेशिक संदर्भ आहे. ‘
ब्राह्मण समाज’, ‘मराठा समाज’ या शब्दप्रयोगाला जातीचा संदर्भ आहे.
‘हिंदू समाज’, ‘मुसलमान समाज’ , ‘जैन समाज’ या शब्दप्रयोगाला धर्माचा संदर्भ आहे. समाजशास्त्रात ‘समाज’ या शब्दाला असा प्रादेशिक , जातीय किंवा धार्मिक गंध नाही. सामान्य माणूस ज्या अर्थाने ‘समाज’ हा शब्द वापरतो, त्याहून निराळा व खास समाजशास्त्रीय ‘समाज’ या संज्ञेला समाजशास्त्रज्ञांनी दिला आहे.
समाज ‘ या संकल्पनेच्या व्याख्या व अर्थ ( Concept of ‘Society’ : Definition and Meaning ) : ‘ समाज ‘ या संकल्पनेचा नेमका समाजशास्त्रीय अर्थ कोणता ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी ‘समाज’ या संकल्पनेच्या समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या पाहाव्या लागतील.
1) मॅकायव्हर आणि पेज “समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे होय (“Society is the web of social relationships” – Maciver and Page )
2) राईट – “केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे, तर समूहातील व्यक्तींमध्ये असणारी संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज होय.” (“It is not a group of people it is the system of relationship that exists between the individuals of the group.”- Wright )
3) टीशलेर व्हायटन आणि हंटर – “समाज म्हणजे व्यापक व सर्वसमावेशक अप्रत्यक्षात अस्तित्वात असणारी एक सामाजिक व्यवस्था होय. समाजात बहुतांशी सदस्याची भरती करण्याची अंतर्गत व्यवस्था असते, तो पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो, त्याला समान संस्कृती आणि विशिष्ट भूप्रदेश असतो.” (“The largest and most Inclusive social system that exists . A society recruits most of its members from within, sustains itself across generations, shares a culture and occupies a territory.” Tischleer, Whitten and Hunter )
4) ड्रेसलर आणि विलिस- “समान संस्कृती असणाऱ्या आणि आपण सर्वजण एक आहोत असे मानणाऱ्या व्यक्तींचा समूह म्हणजे समाज होय .” (“A society is a group of people who share a culture and think of themselves as united” – David Dressler and W.M. Willis Jr.)
5) बिओडोर कँपलो – “सर्व वयोगटातील स्त्री – पुरुषांचा समावेश असणारी स्वयंपूर्ण आणि स्वयंसातत्यशील अशी सामाजिक व्यवस्था म्हणजे समाज होय.” (“A society is a self – sufficient , self – perpetuating social system that includes persons of both sexes and all ages . ” Theodore Caplow )
वरील व्याख्यांचे काळजीपूर्वक अध्ययन केल्यास ‘समाज‘ या संकल्पनेच्या विविध समाजशास्त्रीय अर्थछटा ध्यानात येतील. त्या अशा –
- समाज ही एक सामाजिक व्यवस्था आहे. समाज ही सामाजिक संबंधांची व्यवस्था किंवा सामाजिक संबंधांचे सुव्यवस्थित असे जाळे होय. व्यक्ति – व्यक्तीत, व्यक्ति समूहात आणि समूहा – समूहात स्थिर स्वरूपी सामाजिक संबंध निर्माण होऊन त्यांची एक व्यवस्था बनते.
- समाजाला स्वत:ची अशी संस्कृती असते.
- समाज सापेक्षतः विशाल किंवा व्यापक असा समूह होय.
- समाजाला निश्चित असा भूप्रदेश असतो.
- समाजाच्या काही गरजा असतात.
- समाजाच्या गरजा भागविण्याच्या यंत्रणा समाजाने निर्माण केलेल्या असल्याने समाज सापेक्षतः स्वयंपूर्ण असतो.
- समाज स्वयंसातत्यशील असतो म्हणजेच पिढ्यान् पिढ्या स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची क्षमता त्यात असते.
- समाज त्यातील व्यक्तींच्या बेरजेहून अधिक काहीतरी असतो.
- समाजातील सदस्यांत एकतेची भावना असते.
- समाज ही एक अमूर्त वास्तवता आहे.
सामाजिक दर्जा आणि भूमिका व्याख्या व अर्थ | Definition and Meaning of Social Status and Role
सामाजिक स्थानाचे हे दोन पैलू म्हणजेच दर्जा ( Status ) आणि भूमिका ( Role ) होत . विशिष्ट अशा सामाजिक स्थानाशी संबंधित असलेले हक्क आणि विशेषाधिकार म्हणजे दर्जा होय .
1) राल्फ लिंटन – “दर्जा म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजव्यवस्थेत विशिष्ट काळी, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला असलेले स्थान होय.” ( Status is the place in a particular system which a certain individual occupies at a particular time.” – Ralph Linton )
2) टालकॉट पार्सन्स -A Status is the positional aspect of the role – Talcott Parsons )
3) इलियट आणि मेरिल “समूहांतर्गत स्थानांच्या श्रेणी-व्यवस्थेत व्यक्तीला तिच्या जन्म, वय, कुटुंब, वर्ग, व्यवसाय, विवाह आणि कर्तृत्वसिद्धी यामुळे प्राप्त झालेल्या स्थानाला दर्जा म्हणतात. ( Status is the rank order position , which the individual occupies in the group by virtue of his sex , age , family , class , occupation , marriage and achievement.” – Elliott and Merrill )
1 दर्जाचे प्रकार ( Types of Status )
राल्फ लिंटन यांनी दर्जाचे दोन प्रकार सांगितले आहेत . काही दर्जे समाजाने आपणाला दिलेले असतात, तर काही दर्जे आपण स्वप्रयत्नाने मिळविलेले असतात. जन्म किंवा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा काही घटकांमुळे, व्यक्तीने स्वतः त्यासाठी काहीही प्रयत्न न करता, जे दर्जे व्यक्तीला समाजाकडून बहाल करण्यात येतात, त्यांना प्रदत्त किंवा अर्पित दर्जे ( Ascribed Statuses ) असे म्हणतात. व्यक्तीची इच्छा वा हेतू असो वा नसो हे प्रदत्त दर्जे तिला मिळतातच.
याउलट काही दर्जे व्यक्तीने त्यासाठी खास परिश्रम घेऊन, स्वकर्तृत्वाच्या जोरावर मिळविलेले असतात. त्यांना अर्जित किंवा संपादित दर्जे ( Achieved statuses ) असे म्हणतात.
भूमिका ( Role ) :
- राल्फ लिंटन यांच्या मते, “भूमिका म्हणजे स्थानाचा गतिशील पैलू होय.” (” A role represents the dynamic aspect of position – Ralph Linton )
2) टॉलकॉट पार्सन्स यांच्या मतानुसार, ” कृतीत रूपांतर झालेल्या दर्जाला भूमिका “. ” (“The role is status translated into action” Talcott Parsons )
3) एलि चिनॉय यांच्या मते, “भूमिका म्हणजे विशिष्ट दर्जा धारण करणाऱ्या व्यक्तींना करावे लागणारे किंवा त्यांच्याकडून अपेक्षित असलेले वर्तन होय. ” (“Role is the pattern of behavior expected or required of persons who occupy a particular status – Ely Chinoy )
समूहातील वा समाजातील त्या त्या दर्जावर असलेल्या व्यक्तींनी संबंधित दर्जाशी निगडित अशा हक्कांप्रमाणे आणि कर्तव्यांप्रमाणे व्यक्तींनी वागावे अशी समाजाची अपेक्षा असा भूमिका या संज्ञेचा अर्थ वरील व्याख्यांवरून स्पष्ट होतो.
दुसऱ्या शब्दात , भूमिका हा दर्जाचा कृतिशील पैलू आहे . अर्थात समाजाच्या अपेक्षेप्रमाणे , म्हणजेच भूमिकेप्रमाणे व्यक्तीचे वर्तन व्हावे असे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात अगदी तंतोतंत असे घडतेच असे नाही . उदा . शिक्षकाने जसे बागावे अशी अपेक्षा असते, अगदी त्याबरहुकूम प्रत्येक शिक्षक प्रत्यक्षात वागतोच असे नाही .
प्रत्येक व्यक्ती आपापल्या भूमिकेप्रमाणे वागण्याचा जो प्रयत्न करते त्याला ” भूमिका बठविणे ” ( Role playing ) असे म्हणतात . भूमिका करणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष वर्तनाचा निर्देश करण्यासाठी ” भूमिका – वर्तन ” ( Role Performance किंवा Role – Behavior ) असा शब्दप्रयोग करण्यात येतो. प्रत्येक दर्जाशी संबंधित अशा अनेक भूमिका असू शकतात . एकाच सामाजिक स्थानाशी किंवा एकाच दर्जाशी संरचनात्मकरीत्या संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा एकत्रितरीत्या निर्देश करण्यासाठी “ भूमिका – संच” ( Role – set ) ही संकल्पना समाजशास्त्रज्ञ वापरतात.
व्यक्ती जी निरनिराळी सामाजिक स्थाने भूषवित असते त्या सर्वांचा एकत्रितरीत्या निर्देश करण्यासाठी ‘ दर्जा – संच ‘ ( Status set ) ही संज्ञा वापरली जाते , त्या त्या स्थानानुरूप ज्या विविध भूमिका पार पाडीत असते त्यांचा एकत्रितरीत्या निर्देश करण्यासाठी ‘ बहुविध भूमिका ‘ ( Multiple roles ) ही संज्ञा वापरली जाते . अशा बहुविष भूमिकांपैकी एक भूमिका वठविताना दुसन्या भूमिकेची मदत होऊ शकते . यास उद्देशून ‘ भूमिका प्रबलीकरण ‘ ( Role reinforcement ) असे म्हणतात . पण सर्वच वेळा असे घडत नाही . त्यामुळे तर काही वेळा अपेक्षेप्रमाणे भूमिका वठविण्यात अडचणी येतात.
जेव्हा एकाच भूमिकेत संघर्ष निर्माण करणाऱ्या परस्परविरोधी अशा अपेक्षा असतात तेव्हा ती भूमिका पार पाडताना व्यक्तीला ज्या तणावाला तोंड द्यावे लागते त्याचे वर्णन क ” भूमिका – तणाव ” ( Role strain ) अशी संज्ञा वापरली जाते. ( When a single role has conflicting demands attached to it , individuals who play that role experience role strain )
उदा . जेव्हा सुरक्षितपणे प्रवास करता येतो तेव्हाच आगबोटीचा समुद्रप्रवास सुरू ठेवावा अशी बोटीच्या कप्तानाकडून अपेक्षा असते , पण त्याच वेळी कप्तानाने ठरलेल्या दिवशी उरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी किनाच्यावर बोटीतील माल पोहोचता करावा अशीही अपेक्षा असते , कारण असे झाले नाही तर कंपनीला हजारो रुपयांचा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता असते . बोटीच्या रडार यंत्रणेत बिघाड झाल्याचे जेव्हा कप्तानाला सांगण्यात येते तेव्हा मात्र वर उल्लेखिलेल्या दोन परस्परविरोधी अपेक्षांमुळे कप्तानाच्या मनाची दोलायमान अवस्था होते . अशा परिस्थितीत कप्तानाला जो ताण – तणाव सहन करावा लागतो तो त्याच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित नसतो तर त्याच्या भूमिकाविषयक परस्परविरोधी अपेक्षामुळे निर्माण झालेला असतो . म्हणून समाजशास्त्रज्ञ अशा तणावाचे वर्णन ” भूमिका तणाव ” असे करतात . एकाच वेळी जेव्हा व्यक्ती एकाहून अधिक दर्जे धारण करीत असते आणि अन्य दर्जाशी संबंधित अशा भूमिकाविषयक अपेक्षांचे उल्लंघन केल्याखेरीज तिला जेव्हा एखादी भूमिका वठविणे अशक्य होऊन बसते तेव्हा त्या परिस्थितीचा निर्देश ” भूमिका संघर्ष ” ( Role Conflict ) या संज्ञेने समाजशास्त्रज्ञ करतात .
सामाजिक नियमने म्हणजे काय? | What is Social Norms ? | सामाजिक नियमनांची व्याख्या व अर्थ | Definition and Meaning of Social Norms.
व्यक्ती समाजात अनिर्बंधपणे वागू शकत नाहीत . इतरांशी आंतरक्रिया करताना त्यांना काही नियम पाळावे लागतात . व्यक्ती ज्या समाजाची सभासद असते त्या समाजाची स्वतःची अशी संस्कृती असते. प्रत्येक समाजाच्या संस्कृतीने त्या समाजातील व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या लोकांशी कसे वागावे व कसे वागू नये याविषयीच्या वर्तनपद्धती ठरवून दिलेल्या असतात.
या वर्तनपद्धती अथवा वर्तनरीतींचे पालन करावे अशी समाजाची अपेक्षा असते. व्यक्तीचे सामाजिक वर्तन नियंत्रित करणाऱ्या अशा वर्तनरीती किंवा वर्तनविषयक नियमानांच ‘सामाजिक नियमने’ किंवा ‘प्रमाणके’ (Social Norms) असे म्हणतात. दुसऱ्या शब्दात, समाजातील व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या स्थानांवर असणाऱ्या लोकांशी कसे वागावे याविषयी संस्कृतीने घालून दिलेले वर्तनविषयक नियम म्हणजेच सामाजिक नियमने होत.
प्रत्येक समाजाच्या संस्कृतीने घालून दिलेल्या अशा वर्तनरीती हयाच ‘योग्य वर्तनरीती’ ( Proper behavior patterns ) आहेत अशी त्या त्या समाजाची धारणा असते. त्यामुळे त्यांना अनुसरूनच समाज- सदस्यांनी वर्तन करणे आवश्यक मानले जाते. सामाजिक नियमनांचे स्वरूप असे आदेशवजा असल्याने बहुसंख्य समाजसदस्यांकडून सामान्यतः या नियमनांचे अनुसरण घडून येते. समाजातील वर्तनरीती किंवा नियमने हीच ‘योग्य’ ( proper ) का मानावयाची याविषयीचे सर्वसामान्य स्वरूपाचे आदर्श ( ideals ) हे देखील कोणत्याही समाजाच्या संस्कृतीतील महत्त्वाचे घटक असतात. अशा आदर्शानाच मूल्ये ( values ) असे म्हणतात.
एखाद्या वर्तनाचा चांगले-वाईटपणा किंवा योग्यायोग्यता सामान्य स्वरूपाच्या अशा आदर्शांवरून अथवा मूल्यांवरूनच ठरविली जाते. अशी मूल्ये हीच वर्तनविषयक नियमांचे वा सामाजिक नियमनांचे आधार असतात. व्यक्ती समाजात अनिर्बंधपणे वागू लागल्या तर समाजात गोंधळ माजेल व अस्थैर्य निर्माण होईल. अये होऊ नये म्हणून व्यक्तीच्या सामाजिक वर्तनावर सामाजिक नियामानांच्या स्वरुपात समाजाने बंधने अथवा मर्यादा घातलेल्या असतात.
सामाजिक नियमनांची व्याख्या व अर्थ | Definition of Social Norms.
1)हॅरी जॉन्सन’ -वर्तनावर काही मर्यादा घालणारा मनात बाळगलेला अपूर्ण आदर्श म्हणजे नियमन होय. ( A norm is an abstract pattern , held in the mind , that sets certain limits for behaviour – Harry Johnson )
2) हॉर्टन आणि हंट ‘व्यक्तीच्या वर्तनाविषयीच्या समूहाच्या अपेक्षा म्हणजे नियमन होय. ( A norm is a group expectation of behavior . Horton and Hunt )
3) लाईट आणि केलर ‘परस्परांशी सामाजिक संबंध ठेवताना लोक ज्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करतात त्यांना नियमने म्हणतात . ( Norms are the guidelines people follow in their relations with one another Light and Keller).
4) शेरिफ आणि शेरिफ ‘अपेक्षित वर्तनप्रकारांशी संबंधित अशी मानदंडस्वरूपी सामान्यीकरणे म्हणजे सामाजिक नियमने होत ‘ . ( ‘standardized generalizations concerning expected modes of behavior- Sherif and Sherif ) .
वरील व्याख्यांचे बारकाईने निरीक्षण केल्यास सामाजिक नियमने या संकल्पनेच्या पुढील अर्थछटा ध्यानात येतील :
- सामाजिक नियमने ही वर्तनाविषयीचे आदर्श असतात,
- सामाजिक नियमने अमूर्त ( abstract ) असतात ;
- नियमने व्यक्तीच्या वर्तनावर मर्यादा घालतात किंवा ती व्यक्तीचे वर्तन नियंत्रित करतात ;
- नियमने ही व्यक्ति वर्तनाविषयीच्या समूहाच्या अपेक्षा असतात ;
- नियमने ही सामाजिक संबंधाविषयीची मार्गदर्शक तत्वेच असतात , आणि;
- नियमने मानदंडस्वरूपी सामान्यीकरणे असतात. सामाजिक नियमनांची काही उदाहरणे खालीलप्रमाणे सांगता येतील.
- जेवताना एकाच हाताचा वापर करावा,
- पाहुण्यांचे हसून स्वागत करावे,
- दुसन्याने नमस्कार केल्यास आपणही नमस्कार करावा,
- वडिलधारी मंडळींचा मान राखावा , गुरुजनांशी आदराने वागावे,
- पवित्र वस्तूंचे पावित्र्य बिघडवू नये,
- स्वतःचे काम करण्यासाठी इतरांना धमकी देऊ नये,
- राष्ट्रध्वजाचा मान राखावा,
- पति-पत्नींनी एकमेकांशी एकनिष्ठ राहावे;
- व्यभिचार करू नये.
सामाजिक नियमनांची व्याख्या व अर्थ | Definition and Meaning of Social Norms.
नियमने कशी अस्तित्वात येतात, समाजजीवनात ती आपोआप अजाणतेपणी निर्माण झालेली असतात की एखाद्या यंत्रणेद्वारा नियोजनबद्ध रीतीने ती मुद्दाम तयार केलेली असतात; आणि लोक स्वयंस्फूर्तपणे नियमनांचे पा करतात की त्यांचे पालन व्हावे यासाठी काही यंत्रणा उभ्या केल्या जातात; तसेच ती दीर्घकाळ टिकतात की अल्पावधीतच नाहीशी होतात इ . बाबतीत नियमनांमध्ये भेद आढळून येतात, त्यामुळे विविध निकषांच्या आधारे नियमनांचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे करता येणे शक्य आहे.
- लोकरीती किंवा लोकरूढी ( Folkways
- लोकनीती ( Mores ),
- कायदा ( Law )
लोकरीती ( Folkways ) ही इंग्रजीतील संज्ञा सर्वप्रथम विल्यम ग्रहम सम्नेर या समाजशास्त्रज्ञाने वापरली. ‘Folkways’ या शब्दाकरिता मराठीत ‘लोकरीती’ आणि ‘लोकरूढी’ हे दोन्ही शब्द वापरात आहेत. ‘Folkways’ या संज्ञेच्या काही व्याख्यांवरुन आपणाला लोकरीती किंवा लोकरूढींचे स्वरूप समजून घेता येईल.
1. गिलिन आणि गिलिन- ‘एखाद्या समूहात सामान्यतः अबोधपणे (किंवा अजाणतेपणी ) निर्माण होणारे दैनंदिन जीवनातील वर्तनप्रकार म्हणजे लोकरीती होत. ( Folkways are behavior patterns of everyday life which generally arise unconsciously in a group ‘ . Gillin and Gillin ).
2. सम्नेर – ‘समाजमान्य असे वागणुकीचे किंवा वर्तनाचे प्रकार म्हणजे लोकरीती होत’. ( The folkways are the recognized ways of behaving and acting in society’ . – W G. Sumner ).
3. हॉर्टन आणि हंट – एखाद्या समूहाच्या विविध गोष्टी करण्याच्या रूढ, सर्वसामान्य आणि सवयप्रधान रीती म्हणजे लोकरीती होत.’ ( Folkways are simply the customary, normal, habitual ways a group does things’. -Horton and Hunt )
एखाद्या विशिष्ट समूहातील वा समाजातील लोकांच्या दैनंदिन जीवनात रूढ झालेले वर्तनप्रकार म्हणजे लोकरीती होत . संभाषण, भोजन , अभिवादन, पोशाख यासंबंधीचे वर्तनकार व पद्धती लोकरीतींच्या सदरात मोडतात.
दैनंदिन जीवनात लोक या परंपरागत वागण्याच्या रीतींचे पालन करीत असतात. कोणाशी कसे, किती, काय, किती मोठ्या वा लहान आवाजात बोलावे, जेवायला कसे बसावे, कसे जेवावे, किती जेवावे, किती वेळा जेवावे, कोणते पदार्थ खावेत इ. बाबतीतील रीती एखाद्या समाजातील जवळजवळ सर्वच लोक कमी अधिक प्रमाणात अवलंबतात निर्माण झाल्याचे पाहावयास मिळते.
सामाजिक समूह म्हणजे काय? | What is Social Groups? | सामाजिक समूहाची व्याख्या व अर्थ | Definition of Social Group Meaning
“सामाजिक समूहासंबंधी ऊहापोह करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र ” ( ” Sociology is the science that deals with social groups ) अशी समाजशास्त्राची व्याख्या हॅरि जॉन्सन यांनी केली आहे . यावरून समाजशास्त्रात सामाजिक समूहांच्या अभ्यासाला किती केंद्रीय महत्त्व आहे ते स्पष्ट होते. मनुष्य हा जन्मतः केवळ एक प्राणी ( animal ) असतो. त्याचे समाजीकरणाच्या प्रक्रियेत सामाजिक प्राण्यात ( Social Animal ) रूपांतर होत असते . हे समाजीकरण प्रामुख्याने समूहांच्या माध्यमातून होत असते.
मनुष्य हा एकटा राहू शकत नाही . जन्मापासून अखेरपर्यंत तो समूहातच आपले जीवन व्यतीत करत असतो. याचे मुख्य कारण म्हणजे माणूस व पशुपक्षी यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. केवळ चारा, पाणी मिळवणे आणि जगणे एवढीच पशुपक्ष्यांची गरज असते. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्याही मूलभूत गरजा आहेत. जिवंत राहण्यासाठी आवश्यक अशा शारीरिक गरजांच्या पूर्ततेबरोबरच त्याच्या सामाजिक मानसिक पातळीवरील गरजांची पूर्तता होणे हे मानवी जीवनासाठी तितकेच महत्त्वाचे असते. साहजिकच, या गरजांची पूर्तता एखादी व्यक्ती एकाकी राहून करूच शकत नाही, आणि म्हणूनच माणूस हा माणसांच्या समूहात राहतो.
समूहात राहणे हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. समाजातील आपले जीवन जगतो. आता माणूस ज्या ज्या समूहांचा सभासद असतो. माणूस समाजात राहतो याचा अर्थ तो विविध सामाजिक समूहाचा सभासद या नात्याने समूहांचा त्याच्यावर जबरदस्त प्रभाव पडतो. तेव्हा माणसाचे सामाजिक वर्तन समजून घेण्यासठी समूहांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
सामाजिक समूहाची व्याख्या व अर्थ | Definition of Social Group Meaning
1) थिओडर मिल्स – “एखाद्या हेतूच्या पूर्तीसाठी परस्परांच्या संपर्कात येणाऱ्या आणि असा संपर्क अर्थपूर्ण आहे असे समजणाऱ्या दोन किंवा अधिक व्यक्तींचा मिळून सामाजिक समूह बनतो.” (“Groups are composed of two or more persons who come into contact for a purpose and who consider the contact meaningful .”)
2) ऑगबर्न आणि निमकॉफ “जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि एकमेकांवर प्रभाव पाडतात तेव्हा समूह निर्माण होतो.” (” Whenever two or more individuals come together and influence one another, they may be said to constitute a social group.” )
3) टिशलेर , व्हायटन आणि हंटर यांच्यामते. “आपण एक विभिन्न सामाजिक एकक असल्याची जाणीव असणाऱ्या व समाज संघटनाच्या एखाद्या प्रतिमानानुसार वारंवार आंतरक्रिया करणाऱ्या दोन किंवा अधिक व्यक्तींचा सामाजिक समूहात समावेश होतो.” (“Social group consists of two or more individuals who interact recurrently according to same pattern of social organization and who recognize that they constitute a distinct social unit.”
4) हॉर्टन आणि हंट – सदस्यत्वाची व आंतरक्रियांची जाणीव असणारे कितीही लोक म्हणजे सामाजिक समूह होय. ( “Any number of persons who share a consciousness of membership and of interaction.” )
5) एलि चिनॉय – “परस्पर संबंधित भूमिका आणि दर्जाच्या संचावर ज्यांच्यामधील संबंध अवलंबून असतात अशा व्यक्तींचा समावेश सामाजिक समूहात होतो. A social group consists of a number of persons whose relationships are based upon a set of interrelated roles and statuses.”)
वरील व्याख्यांमधून सामाजिक समूह या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणारे खालील मुद्दे सांगता येईल.
- समूह बनण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्ती आवश्यक असतात.
- त्यांच्यात वारंवार आंतरक्रिया व्हाव्या लागतात.
- त्यांना या आंतरक्रियांची जाणीव असावी लागते.
- या आंतरक्रिया अर्थपूर्ण आहेत असे त्यांना वाटावे लागते.
- इतर व्यक्ती आपल्या समूहाच्या सभासद आहेत या जाणिवेप्रमाणेच आपणही संबंधित असल्याची जाणीव समूह-सभासदांत असते.
- समूहात प्रत्येक सभासदाला काही एक स्थान असते. व कोणत्याही समूहातील सर्व स्थाने व भूमिका परस्पर संबंधित असतात व व्यक्तीचे वर्तन , दर्जा आणि भूमिकांशी संबंधित नियमनांनुसार सामान्यतः होत असते.
- समूहातील सदस्यांची तसेच समूहांची स्वतःची काही उद्दिष्टे किंवा हेतू असतात आणि समूहाचे सदस्य ( एकमेकांच्या सहकार्याने ) ती उद्दिष्टे पार पाडीत असतात.
संस्कृती म्हणजे काय? | What is Culture? | संस्कृतीची व्याख्या आणि अर्थ | Definition and Meaning of Culture
1) सर एडवर्ड बी . टायलर – “संस्कृती ही एक अशी संकीर्ण समग्रता आहे की ज्यात ज्ञान , श्रद्धा , कला , नीती , कायदा , रूढी या व अशाच इतर पात्रतांचा व सवईचा समावेश होतो आणि या गोष्टी व्यक्तीने समाजाचा सभासद या नात्याने संपादित केलेल्या असतात.” (“Culture is that complex whole which includes knowledge, beliefs, art, morals, law, custom and any other capabilities and habits acquired by man as a member of society.”)
2) हॉर्टन आणि हंट- “ज्याचे सामाजिक अध्ययन होते आणि ज्यात समाजातील सदस्यांचा सहभाग असतो असे सर्व काही म्हणजे संस्कृती होय . “Culture is everything which is socially learnt and shared by the members of society.” )
3) ड्रेसलर आणि विलिस “अनेक लोकांना समान असलेल्या आणि ज्यांचे लोकांकडून आपल्या मुलांकडे संक्रमण होते. ती कौशल्ये, श्रद्धा, ज्ञान आणि उत्पादित वस्तू अशा सर्व गोष्टींचा संस्कृतीत समावेश होतो.” (“Culture consists of the sum total of skills, beliefs, knowledge, and products that are shared by a number of people and transmitted to their children.”)
4) हरस्कोव्हिटस् – “संस्कृती हा पर्यावरणाचा मानवनिर्मित भाग होय.” (“Culture is the man – made part of the environment.”)
5) डॉ . इरावती कर्वे – “ संस्कारपूर्ण व संस्कारमय जीवन जगण्याची देशकालविशिष्ट रीत ( जीवनपद्धती व जीवनमूल्ये ) म्हणजे संस्कृती.”
6) टिशलेर , व्हायटन आणि हंटर – “मानवी व्यक्ती ज्या समूहाच्या सभासद असतात त्यात त्या जे जे करावयास, वापरण्यास, उत्पादित करण्यास, माहीत करून घेण्यास आणि श्रद्धा ठेवण्यास शिकतात त्या सर्व गोष्टींना संस्कृती म्हणतात.” (“All that ) human beings learn to do, to use, to produce, to know and to believe in the social groups to which they belong.”)
वरील व्याख्यांमध्ये संस्कृतीचा समाजशास्त्रीय अर्थ स्पष्ट करणारे खालील मुद्दे आले आहेत.
- संस्कृती ही एक संकीर्ण म्हणजेच गुंतागुंतीची बाब असून तीत अनेक गोष्टींचा समावेश होतो.
- संस्कृतीत मानवनिर्मित, भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही घटकांचा समावेश होतो . उदा . कौशल्ये , श्रद्धा , ज्ञान , नीतिकल्पना या अभौतिक बाबी होत तर मानवाने निर्माण केलेल्या घरे , दागिने , कपडे , इमारती , यंत्रे , अवजारे इ . या भौतिक किंवा डोळ्याने दिसणाऱ्या बाबी आहेत . संस्कृती या दोन्ही घटकांची मिळून बनलेली संकीर्ण समग्रता आहे.
- संस्कृतीतील विविध गोष्टी व्यक्ती समाजाचा सभासद या नात्याने शिकून घेते.
- संस्कृती ही समूहविशिष्ट किंवा समाजविशिष्ट तसेच कालविशिष्ट बाब आहे . म्हणजेच प्रत्येक समूहाची / समाजाची विशिष्ट अश संस्कृती असते आणि ती कायमस्वरूपी स्थिर राहणारी बाब नसून कालौघात म्हणजे काळाप्रमाणे बदलत जाते.
- विशिष्ट समूहातील किंवा समाजातील सर्वांसाठी ( वा बहुसंख्य सदस्यांसाठी ) त्या समूहाची वा समाजाची संस्कृती समान असते म्हणजेच संस्कृतीत सर्वांचा सहभाग असतो. (Culture is shared .)
- संस्कृती म्हणजे विशिष्ट समाजाची विशिष्ट कालखंडातील जीवनरीत ( way of life ) होय.
- एक पिढी आपली संस्कृती दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करीत असते. संस्कृती ही निसर्गदत्त बाब नाही.
समाजीकरण म्हणजे काय? | What is Socialization? | : समाजीकरणाची व्याख्या व अर्थ | Socialization Definition & Meaning
1) टिशेलर , व्हायटन आणि हंटर “समाजाचा सभासद म्हणून कार्यरत राहण्यासाठी गुंतागुंतीच्या सामाजिक आंतरक्रियात्मक प्रक्रियांत शिकते त्याला समाजीकरण आवश्यक असलेली बौद्धिक , शारीरिक आणि समाजिक कौशल्ये मूल ज्या प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या सामाजिक आंतरक्रियात्मक प्रक्रियांत शिकते त्याला सामाजिकीकरण असे म्हणतात. (“The long and complicated processes of social interaction through which a child leams the intellectual , physical and social skills needed to function as a member of society is called socialization).
2) वॉलेस आणि वॉलेस – “समाजाच्या दृष्टीने योग्य अशा श्रद्धा आणि वर्तनप्रकार व्यक्तींमध्ये संक्रमित करून त्यांच्या ‘ स्व ‘ चा किंवा व्यक्तिमत्त्वाचा विकास होणे शक्य करणारी प्रक्रिया म्हणजे समाजीकरण होय.” (“Socialization is the process of transmitting socially appropriate beliefs and behavior patterns to an individual and making possible the development of a ‘ self’, or personality.”)
3) ड्रेसलर आणि विलिस ” ज्या प्रक्रियेद्वारा त्याच्या किंवा तिच्या संस्कृतीत जे मानले जाणारे वर्तनप्रकार आणि नियमने व्यक्ती शिकून घेते आणि त्यांचा अवलंब कर त्या प्रक्रियेला समाजीकरण असे म्हणतात.” (“Socialization is the process by which an individual learns and adopts the behaviour patterns and norms considered appropriate in his or her culture”).
4) हॅरी जॉन्सन – “सामाजिक भूमिका पार पाडण्याचे सामर्थ्य शिकणाऱ्याला प्राप्त करून देणारे शिक्षण म्हणजे समाजीकरण होय. समाजीकरणात संस्कृती शिकून घेतली जाते.” (“Socialization is learning that enables the learner to perform social roles. Culture is what is learnt in socialization”).
5) लाईट आणि केल्लर- “जिवंत राहण्यासाठी तसेच माणूस बनण्यासाठी आणि समाजाचा सभासद होण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असलेली शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कौशल्ये संपादन करण्याची प्रक्रिया म्हणजे समाजीकरण होय.” (“The socialization” is process of acquiring the physical, mental and social skills that a person needs to survive and to become both an individual and a member of society is called socialization.
6) हॉब्ज आणि ब्लॅक – “समाजीकरणामुळे सजीव प्राण्याचे सामाजिक मानवा रूपांतर होते. (“Socialization transforms the biological organism into a social being.” )
संदर्भ समूह म्हणजे काय? | What is reference Group? | संदर्भ समूहाची व्याख्या आणि अर्थ | Definition and Meaning of Reference Group
1) टीशलेर, व्हाटन आणि हंटर – “वर्तनाचे मूल्यमापन करण्यासाठी ज्या समूहाच्या मनांचा मानदंड म्हणून वापर केला जातो त्याला संदर्भ समूह म्हणतात.” (“A group whose norms are used as a standard to evaluate behavior.”)
2) वॉलेस आणि वॉलेस-“एखादी व्यक्ती स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी ज्या समूहाचा संदर्भ घेते त्याला संदर्भ समूह असे म्हणतात. (“A reference group is the group one refers to when one evaluates oneself.”)
3) विल्यम पी . स्कॉट ( समाजशास्त्राचा शब्दकोश ) “व्यक्ती आपल्या श्राद्ध, अभिवृत्ती, मुल्ये यांची व्याख्या करण्यासाठी आणि आपल्या वर्तनाला दिशा देण्यासाठी ज्या समूहाचा वा सामाजिक प्रवर्गाचा वापर करते त्याला संदर्भ समूह असे म्हणतात.” ( A group or social category that an individual uses to help define his beliefs, altitudes, and values and to guide his behavior.”)
4) हॅरी जॉन्सन- “स्वतःचे , स्वतःच्या परिस्थितीचे व्यक्तिगत आकांक्षांचे किंवा स्वतःच्या समूहाचे वा त्याच्या आकांक्षांचे मूल्यमापन करताना वापरण्यात येणाऱ्या संदर्भ चौकटीचा भाग असणाऱ्या वास्तव वा कल्पित अशा कोणत्याही समूहाविषयीचे व्यक्तीचे संकल्पन हा एखाद्या व्यक्तीचा संदर्भ समूह असू शकतो.” (“Any group is a reference group for someone if his conception of it, which may or may not be realistic, is part of his frame of reference for appraisal of himself or of his situation, aspirations for himself, or appraisal of or aspirations for one of the groups to which he belongs.”)
सामाजिक संस्था म्हणजे काय? | What is Social Institution? | सामाजिक संस्थेची व्याख्या | Definition of Social Institution
1) किंग्जले डेव्हिस – ‘एका किंवा अनेक कार्याच्या भोवती रचल्या गेलेल्या आणि परस्परांत गोवल्या गेलेल्या लोकरीती , लोकनीती आणि कायदे यांचा संच म्हणजे संस्था होय’. (An Institution may be defined as a set of interwoven folkways, mores and laws built around one or more functions’.- Kingslay Davis )
2) टिशलेर व्हायटन आणि हंटर- ‘ समाजाच्या मूलभूत सामाजिक गरजा भागविणाऱ्या क्रियांचे संघटन करणाऱ्या मूल्ये, नियमने, दर्जे आणि भूमिका यातून निर्माण होणाऱ्या, सुव्यवस्थित सामाजिक संबंधांना सामाजिक संस्था असे म्हणतात. ( The ordered social relationships that grow out of the values, norms, statuses, and roles that organize those activities that fulfill society’s fundamental needs – Tischler, Whitten and Hunter )
3) हॉर्टन आणि हंट म्हणतात ‘संस्था म्हणजे सामाजिक संबंधांची संघटित अशी व्यवस्था की ज्यामध्ये काही समान मूल्ये आणि वर्तनरीतींचा समावेश होतो आणि जी समाजाच्या काही मूलभूत गरजा भागविते. ( ‘An institution is an organized system of social relationships which embodies certain common values and procedures and meets certain basic needs of the society.’ – Horton and Hunt )
4) ऑगबर्न आणि निमकॉफ : – ‘सामाजिक संस्था म्हणजे काही मूलभूत मानवी गरजा भागविण्याचे संघटित आणि प्रस्थापित असे मार्ग होत’. (‘ Social institutions are organized and established ways of satisfying certain basic human needs’. – Ogburn and Nimkoff )
वरील व्याख्यांचे परीक्षण केल्यास ‘सामाजिक संस्था’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट होईल. वरील व्याख्यांत दोन महत्त्वाचे मुद्दे दिसून येतात .
- मानवाच्या तसेच मानवी समाजाच्या काही मूलभूत गरजा असतात आणि त्या गरजांची पूर्ती करण्यासाठी सामाजिक संस्था अस्तित्वात आलेल्या असतात.
- सामाजिक संस्था ( अ ) नियमने आणि मूल्ये यांचा संच ( ब ) सामाजिक संबंधांची व्यवस्था या परस्परसंबंधित अशा दोन गोष्टींनी मिळून बनलेली असते.
सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय? | What is Social Stratification? | सामाजिक स्तरीकरणाची व्याख्या | Definition of Social Stratification.
सर्वच समाजांत सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांची विषम वाटणी झालेली असते. समाजातील व्यक्ती व समूहात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे जे विषम वितरण झालेले असते त्यातून समाजात भिन्न भिन्न दर्जा असणारे विविध स्तर निर्माण होतात. या स्तरांच्या सामाजिक दर्जातील भिन्नतेमुळे त्यांची श्रेष्ठ-कनिष्ठ अशी रचना झालेली असते. समाजातील एखादा स्तर सर्वाधिक श्रेष्ठ, दुसरा त्याहून कमी श्रेष्ठ, तिसरा त्याहूनही कमी दर्जा असणारा, अशी विभिन्न दर्जाच्या अनेक स्तरांत झालेली समाजाची विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय.
उदा .बड़े जमीनदार, मध्यम शेतकरी, अल्पभूधारक आणि शेतमजूर असे विविध स्तर ग्रामीण समाजात दिसतात.
कोणत्याही समाजात श्रीमंत व्यक्ती वा कुटुंबाचा उच्च वर्ग, मध्यम आर्थिक स्थिती असणाऱ्यांचा मध्यम वर्ग तर अगदी बेताची आर्थिक स्थिती असणान्यांचा करिष्ठ वर्ग अशी विभागणी असते.
थोडक्यात समाजातील विविध स्तरांची दर्जाच्या आधारे झालेली अशी उतरंडीसारखी रचना म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय.
1) एलि चीनॉए,- “कनिष्ठ, श्रीमंत आणि गरीब, सत्ताधारी आणि सत्ताविहीन यांच्यातील तफावत किंवा भेद हा सामाजिक स्तरीकरणाचा गाभा होय.” . ” Contracts between higher and lower, rich and poor, powerful and poverless constitute the substance of social stratification.” Ely Chinoy )
2) सोरोकिन- ” एखाद्या समाजाचे एकावर एक रचलेल्या वर्गामध्ये झालेले श्रेणीतील विभेदन म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय.” (“Social stratification means the differentiation of a given population into hierarchically superimposed classes.”- Pitirim Sorokin )
3) ड्रेसलर आणि विलिस ” समाजाने सामान्यपणे स्वीकृत केलेल्या निकषांच्या आधारे सामाजिक स्थाने आणि भूमिकांचे मूल्यमापन करून त्यांना दर्जा आणि विभेदीत स्वरूपातील पारितोषिके प्रदान करण्याची व्यवस्था म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय.” ( Social stratification -The evaluation, ranking, and differential rewarding of positions and roles on the basis of criteria that are generally accepted by society.” Dressler and Willis Jr. )
4) टिशलेर व्हायटन आणि हंटर– “जेव्हा सामाजिक विषमता समाज-संरचनेचा भाग बनून एका पिढीकडून दुसन्या पिढीकडे संक्रमित होते तेव्हा सामाजिक स्तरीकरण अस्तित्वात येते. समाजाच्या प्रमुख सामाजिक संस्थांमार्फत सामाजिक स्तरीकरणात सातत्य राखले जाते.” (“Social Stratification- A condition that exists when social Inequality becomes part of the social structure and as transmitted from one generation to the next … is perpetuated by the major institutions of society.” – Tischler , Whitten and Hunter )
5) थिओडोर कॅपलो- “समाजव्यवस्थेच्या सदस्यांची विषम दर्जा असलेल्या स्तरात झालेली रचना म्हणजे स्तरीकरण होय.” (“Stratification is the arrangement of the members of a social system in starta or levels having unequal status -Theodore Caplow ).”
वरील व्याख्यांवरून विषमता ( inequality ) हा सामाजिक स्तरीकरणाचा प्रमुख आधार होय
समुदाय म्हणजे काय? | What is Community? | समुदायाची व्याख्या & अर्थ | Community Definition & Meaning.
एखाद्याला समुदाय म्हणजे काय असे विचारले तर व्यक्तीच्या ठिकाणी आपले संपूर्ण जीवन व्यतीत करते तो समुदाय होय असे स्वभाविक उत्तर मिळते.मात्र विविध समाजशास्त्रज्ञ विविध समूहांचा समुदाय म्हणून उल्लेख करताना आढळतात. ‘धार्मिक समुदाय’ जसे शीख समुदाय, ‘वांशिक समुदाय’, एखाद्या व्यवसायाच्या सदस्यांचा समुदाय उदाहरणार्थ ‘शिक्षक समुदाय’, ‘ग्राम समुदाय’, ‘नागर समुदाय’, ‘आदिवासी समुदाय’, एखादे राष्ट्र (नेशन) अशा अर्थाने समाजशास्त्रज्ञ समुदाय ही संकल्पना वापरताना आढळतात.
समाजशास्त्रज्ञांनी समुदायाची केलेली काही व्याख्या
1) जॉर्ज हिलरी “विशिष्ट भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या, परस्परांशी आंतरक्रिया करणाऱ्या आणि एक किंवा अधिक भावनात्मक बंध असणाऱ्या लोकांच्या समूहाला “समुदाय” असे म्हणतात.” (“Community consists of persons in social interaction within a geographical area and having one or more additional ties” – George Hillery)
2) टिशलेर , व्हायटन आणि इंटर- “जे लोक परस्परांच्या निकट राहतात आणि परस्परांशी वारंवार आंतरक्रिया करतात आणि आपल्याला समान असे काही गुणधर्म किंवा मूल्ये आहेत असे ज्यांना वाटते अशा लोकांचा समावेश समुदायात होतो.” (“Community consists of people who live close to one another, who interact with one another frequently, who feel they have some common traits or values they share with one another.” – Tischler, Whitten and Hunter)
3) मॅक आयव्हर आणि पेज “जेव्हा कोणत्याही लहान अगर मोठ्या समूहाचे सदस्य अशा रीतीने एकत्र राहतात की , त्यांच्यामध्ये एखादाच विशिष्ट हितसंबंध समान असत नाही तर सामान्य जीवनाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टी समान असतात , तेव्हा त्या समूहाला समुदाय असे म्हणतात.” (“Wherever the members of any group, small or large, live together in such a way that they share, not this or that particular interest, but the basic conditions of a common life, we call that group a community.” – Maciver and Page)
4) विल्यम स्कॉट यांनी समाजशास्त्राच्या शब्दकोशात दिलेली व्याख्या ; “मर्यादित भूप्रदेशावरील लोकांची अशी एकत्रित वसाहत की , ज्यात परस्परावलंबी संबंधांच्या व्यवस्थेतून लोक त्यांच्या अनेक दैनंदिन गरजा भागवितात.” (“A concentrated settlement of people in a limited territorial area, within which they satisfy many of their daily needs through a system of interdependent relationships.” – William P. Scott )
सामाजिक नियंत्रण म्हणजे काय? | What is Social Control? | सामाजिक नियंत्रणाची व्याख्या | Definition of Social Control.
‘सामाजिक नियंत्रण’ ( Social Control ‘) ही संज्ञा सर्वप्रथम Edward A. Ross या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने वापरली. व्यक्तीचे वर्तन समूहाच्या अपेक्षांनुसार रहावे यासाठी नियमनात्मक स्वरूपाचे कार्य करणाऱ्या संस्था या सामाजिक नियंत्रण ही संज्ञा रॉस यांनी वापरली होती.
“ ज्याद्वारे समाज आपल्या सभासदांकडून समाजमान्य वर्तनाच्या आदर्शाना अनुरूप असे वर्तन घडवून आणतो,अशा योजनापद्धतींची व्यवस्था म्हणजे ‘सामाजिक नियंत्रण’ (“Social control is a system of devices whereby society brings its members into conformity with the accepted standard of behavior”) अशी रॉस यांनी सामाजिक नियंत्रणाची व्याख्या केली आहे. अतिनैसर्गिक (Supernatural ) शक्तीवरील श्रद्धा, समारंभ, लोकमत, नीतितत्त्वे, कला, शिक्षण, कायदा, सूचना, धर्म, सामाजिक मूल्यमापन इ. गोष्टींची , समाजाची नियमनात्मक संरचना टिकवून ठेवण्यातील महत्त्वाची भूमिका रॉस यांनी स्पष्ट केली आहे.
सामाजिक नियंत्रण काही व्याख्या
1) लँडिस पी .एच. – “ज्या प्रक्रियेद्वारा समाजात व्यवस्था प्रस्थापित केली जाते आणि ती टिकवून ठेवली जाते त्या प्रक्रियेला सामाजिक नियंत्रण असे म्हणतात.” (“Social control is the process by which order is established and maintained in society”. )
2) वॉलेस आणि वॉलेस- “ज्या साधनांद्वारे, समाजाचे सभासद समाजाची नियमने पाळावीत म्हणून एकमेकांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतात त्याला सामाजिक नियंत्रण असे म्हणतात . (Social control is the means by which members of a society attempt to induce each other to comply with the society’s norms )
3) ड्रेसलर आणि विलिस – “संस्कृतीमान्य रीतीने, किंवा संस्कृतीने परिभाषि केलेल्या पद्धतीने, वागण्यास व्यक्तींना प्रोत्साहित करणारी शक्ती म्हणजे सामाजिक नियंत्रण होय.” ( “Social control is the force that encourages the individual to behave in a culturally defined , approved manner.”
4) शेपर्ड , ओडोम आणि ब्रूटन- “व्यक्तींना नियमनांचे अनुसरण करण्यास (नियमनांनुसार वागण्यास) भाग पाडणारी प्रक्रिया म्हणजे सामाजिक नियंत्रण होय.” (Social control is the process of constraining persons to conform to norms)
5) हॅरी जॉन्सन –“विचलनात्मक वर्तन म्हणजे केवळ नियमनाचा भंग करणारे वर्तन नव्हे तर कर्ता संबंधित नियमनाशी अभिमुख असूनही तो मुद्दाम त्या नियमनाचा सहेतुक भंग करतो तेव्हा त्याला विचलनात्मक वर्तन म्हणतात. ( “Deviant behavior is not merely behavior that happens to violate a norm, it is behavior that violates a norm to which the actor is oriented at that time, it is motivated violation” )
वरील सर्व व्याख्या एका प्रमुख बाबीला केंद्रवर्ती महत्त्व देतात. ती बाब म्हणजे व्यक्तीकडून सामाजिक नियमनाचा किंवा समूहाच्या अपेक्षांचा भंग करणारे वर्तन घडले असेल तर त्याला विचलन किंवा विचलनात्मक वर्तन असे म्हणतात .
दुसरे असे की, ज्या समूहात व्यक्तीकडून वर्तन घडते त्या समूहाच्या नियमनांचा भंग करणारे वर्तन विचलनात्मक वर्तन ठरते. तिसरी बाब म्हणजे, विचलनात्मक वर्तनाची दिशा आणि प्रमाण या बाबतीत त्यासंबंधीच्या नियमनाहून असे वर्तन बऱ्याच प्रमाणात निराळे असते. चौथी गोष्ट म्हणजे, नियमनाची माहिती नसताना किंवा जाणीव नसताना अज्ञानामुळे किंवा अजाणतेपणी घडून येणाऱ्या नियमनभंगाला विचलन म्हणण्यास काही समाजशास्त्रज्ञ तयार नाहीत.
सामाजिक चळवळींची व्याख्या आणि स्वरूप ( Definition and Nature of Social Movements ) ‘
1) टर्नर आणि किलियन -“एकत्रित आलेले अनेक लोक ज्या समूहाचे किंवा समाजाचे घटकभाग असतात, त्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा परिवर्तनाला चळवळ असे म्हणतात. विरोध करण्यासाठी जेव्हा काहीशा सातत्याने कार्यरत असतात तेव्हा त्याला सामाजिक ( “A collectivity acting with some continuity to promote or resist a change in the society or group of which it is a part.”
2)रुडॉल्फ हेबेलें-“एखाद्या समाजातील प्रस्थापित संबंधांत रूपांतरण ( किंवा परिवर्तन ) घडवून आणण्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न. ( ” Collective effort to चळवळ होय. transform established relations within a particular society ” ) म्हणजे सामाजिक – ” ”
3) ड्रेसलर आणि विलिस “ अनेक लोक हेतूपूर्वक आणि सामूहिकरीत्या परिवर्तन घडवून आणण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्याला सामाजिक चळवळ असे.